डेंग्यू, लेप्टोमुळे दोघांचे मृत्यू

By Admin | Updated: September 27, 2016 03:10 IST2016-09-27T03:10:57+5:302016-09-27T03:10:57+5:30

सप्टेंबर महिन्यात डेंग्यू, कावीळ आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तरुणांना डेंग्यूच्या डासांनी डंख मारल्याचे चित्र दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यांत १५ ते २९ वयोगटातील १५५ मुलांना

Dengue, Lepto causes death of both | डेंग्यू, लेप्टोमुळे दोघांचे मृत्यू

डेंग्यू, लेप्टोमुळे दोघांचे मृत्यू

मुंबई : सप्टेंबर महिन्यात डेंग्यू, कावीळ आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तरुणांना डेंग्यूच्या डासांनी डंख मारल्याचे चित्र दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यांत १५ ते २९ वयोगटातील १५५ मुलांना डेंग्यूची बाधा झाली असून त्यापैकी एकीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. लेप्टोस्पायरसिसमुळेही एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसानंतर पुन्हा एकदा मुंबईत डेंग्यू आणि कावीळ डोकेवर काढत असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यांत डेंग्यूचे २४८ रुग्ण आढळून आले होते. तर, यंदा २५ दिवसांत डेंग्यूचे २९६ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्यावर्षी कावीळीचे ८६ रुग्ण आढळले होते. यंदा हा आकडा शंभरीच्या पलिकडे गेला असून १०८ रुग्णांची नोंद झाली आहे.
डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये ७६ टक्के पुरुषांना तर २४ टक्के महिलांना डेंग्यूची बाधा झाली आहे. ७९.८ टक्के डेंग्यू रुग्ण हे १५ ते ४५ वयोगटातील आहेत. दिवसा बाहेर फिरणाऱ्या, आॅफीसला जाणाऱ्या वयोगटातील व्यक्तींना डेंग्यूची बाधा झालेली आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील फक्त ६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचा डास हा फक्त दिवसा चावत असल्यामुळे नोकरी करणाऱ्या पुरुषांना डेंग्यूचा डंख झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
विक्रोळीमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय मलीचा डेंग्यूमुळे २१ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. ३ सप्टेंबरला या मुलीला अंगदुखी, डोकेदुखी, ताप असा त्रास सुरु होता. त्यानंतर १३ सप्टेंबरला या मुलीला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डेंग्यूमुळे श्वसनाचा त्रास आणि एकावेळी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला.
जनकल्याण नगरमध्ये राहणाऱ्या १८ वर्षीय मुलाचा लेप्टोस्पायरसिसमुळे मृत्यू झाला आहे. या मुलाला १५ सप्टेंबर रोजी ताप आणि डोळे आले होते. गणपतीत तो साचलेल्या पाण्यातून चालला होता. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला १७ सप्टेंबरला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ सप्टेंबरला त्याचा लेप्टोस्पायरसिसमुळे मृत्यू झाला.

सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आॅक्टोबर महिन्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून महापालिका घरांची तपासणी करते. ५५० घरांची महापालिकेने तपासणी केली असून आत्तापर्यंत ३ हजार ३०० लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी तिघांना ताप असल्याचे आढळून आल्यावर त्यांना जवळच्या दवाखान्यात पाठवून उपचार देण्यात आले. त्याचबरोबरीने एम-पूर्व वॉर्डमध्ये २१ सप्टेंबरला पेस्टकंट्रोल करण्यात आले.

Web Title: Dengue, Lepto causes death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.