गिरगावात साकारले गड-किल्ल्यांचे प्रदर्शन
By Admin | Updated: November 8, 2016 02:56 IST2016-11-08T02:56:56+5:302016-11-08T02:56:56+5:30
विविध गड- किल्ल्यांवर राज्याचा वैभवशाली इतिहास दडलेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत दिवाळीत घराच्या अंगणात या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती दिमाखात उभ्या असायच्या

गिरगावात साकारले गड-किल्ल्यांचे प्रदर्शन
मुंबई: विविध गड- किल्ल्यांवर राज्याचा वैभवशाली इतिहास दडलेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत दिवाळीत घराच्या अंगणात या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती दिमाखात उभ्या असायच्या. काळ बदलत गेला शहरी भागात वस्ती वाढत गेली आणि यातच घरापुढचे अंगण हरवले. पर्यायाने दिवाळी ही फक्त आकाशकंदील, फराळ, रोषणाई आणि फटाक्यांपुरती मर्यादित झाली. हरवलेल्या दिवाळीतले गड-किल्ले आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी गिरगावात दोन दिवसीय प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दक्षिण मुंबईतल्या गिरगावसारख्या भागांत किल्ले आता दुर्मिळच झाले आहेत. किल्ले करणे ही एक कला आहे. नव्या पिढीपर्यंत ही कला, परंपरा पोहचावी म्हणून गिरगावातील तरुणांनी एकत्र येऊन ‘गिरगाव प्रबोधन’तर्फे ‘किल्ले प्रदर्शन, स्पर्धा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
शनिवार आणि रविवारी शारदासदन शाळेच्या आवारात या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला गिरगावकरांनी गर्दी केली होती. याठिकाणी फोटो प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फोटो प्रदर्शनात ५० हून अधिक व्यक्ती मुंबईसह ठाणे, पुणे येथून सहभागी झाल्या होत्या. यंदाच्या प्रदर्शनात मुख्य आकर्षण म्हणजे आठ फूट लांबीचा रायगड साकारला आहे. याचबरोबरीने प्रदर्शनात सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, परांडा अशा विविध गड -किल्ल्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.
गड -किल्ल्यांच्या स्पर्धेत परिंदाच्या प्रतिकृती केलेल्या टीम क्रिटिव्हिओला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तर, संकेत आणि निनाद बाचल यांना सिंधुदुर्गसाठी आणि मंदार आर्टला रायगडासाठी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तर, फोटो स्पर्धेत कमल वर्मा यांना प्रथम, परेश खाताडे याला द्वितीय आणि सचिन वैद्य याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
गेल्या वर्षीही आयोजित केलेल्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला असून लहान मुलांचाही यात सहभागी होता. त्यामुळे आमचा हेतू काही प्रमाणात सफल झाला असल्याचे मत प्रबोधनच्या संकेत सुबेदार यांनी दिली. (प्रतिनिधी)