खोपोली - पेण रस्त्यावर धनगर समाजाची निदर्शने
By Admin | Updated: August 15, 2014 02:03 IST2014-08-15T02:03:26+5:302014-08-15T02:03:26+5:30
जय मल्हार समाज सेवाभावी संस्था रायगड यांच्यावतीने खोपोली - पेण रस्त्यावर पाली फाटा येथे आज गुरुवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला.

खोपोली - पेण रस्त्यावर धनगर समाजाची निदर्शने
खोपोली : राज्य घटनेतील धनगर समाजाला अनुसूचित जाती - जमातीत आरक्षण मिळावे यासाठी जय मल्हार समाज सेवाभावी संस्था रायगड यांच्यावतीने खोपोली - पेण रस्त्यावर पाली फाटा येथे आज गुरुवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला.
जय मल्हार, मी धनगर या नावाच्या टोप्या परिधान केलेल्या धनगर समाजाच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांने खोपोली - पेण हा राज्यमार्ग पाली फाटा चौकात अर्धा तास रोखून धरला. या दरम्यान आंदोलकांनी धनगर समाजाला अनुसूचित जाती - जमातीत समाविष्ट करा, शासनाने तात्काळ यासंबंधी कारवाई करा, मागण्या मंजूर झाल्याच पाहिजे या व अनेक घोषणा दिल्या. जय मल्हारच्या घोषणेने तर परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाचे नेतृत्व धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे, उपाध्यक्ष बाळासाहेब आखाडे व स्थानिक स्तरातून भरत कोकरे, हरेश कोकरे, संपत ढेबे इ. या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला. सुरुवातीस आंदोलकांनी मुंबई - पुणे दु्रतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यास मज्जाव केल्यानंतर आंदोलकांनी खोपोली - पेण रस्त्यावर पाली फाटा येथे रास्ता रोको केला.
पोलीस निरीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून नंतर सोडून दिले. यावेळी आंदोलकांनी तहसीलदार दीपक आकडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. (वार्ताहर)