Join us

रमाबाई आंबेडकर पुनर्विकास प्रकल्पाच्या २९०० झोपड्यांचे पाडकाम पूर्ण; ४०५३ झोपड्या पाडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:09 IST

एप्रिलअखेरपर्यंत हा भूखंड मोकळा केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करण्यात येणाऱ्या १७ एकर भूखंडावरील ४०५३ झोपड्यांपैकी २९०० झोपड्या रिकाम्या करून त्यांचे पाडकाम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पूर्ण केले आहे. जवळपास ११ एकर भूखंडाचे सपाटीकरण झाले असून उर्वरित झोपड्या १० एप्रिलपर्यंत पाडण्याचे नियोजन एसआरएने केले आहे. एप्रिलअखेरपर्यंत हा भूखंड मोकळा केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

एसआरए आणि  एमएमआरडीए संयुक्त भागीदारीत रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील १४,४५४ झोपडीधारकांचे पुनर्वसन करणार आहे. आतापर्यंत १०,५०१ झोपड्यांची पात्रता निश्चिती झाली आहे. पहिल्या टप्प्यात कामराजनगर येथील ४०५३ झोपड्यांच्या १७ एकर जागेचा पुनर्विकास  होणार आहे. येथे ८५०० झोपडीधारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित भागातील झोपडीधारकांचा आणखी दोन टप्प्यांत पुनर्विकास केला जाईल. कामराजनगरातील ४०५३ पैकी २,९३१ झोपडपट्टीधारकांची पात्रता पूर्ण झाली आहे. ३६९९ झोपडीधारकांशी एसआरएने विकास करारनामा केला आहे.

कसा होणार पुनर्विकास?

प्रकल्पाचे काम चार क्लस्टरमध्ये होणार आहे. पहिल्या क्लस्टरमध्ये ४०५३ झोपड्या आहेत. या भागावर ८५० घरे उभारली जातील. दुसऱ्या क्लस्टरमध्ये ८,५३९ झोपड्या, तिसऱ्यामध्ये ९८१ झोपड्या आणि चौथ्यामध्ये ६८५ झोपड्या आहेत. प्रभातनगर १६९ आणि अन्य  २७ झोपड्यांचाही समावेश आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील १२८४ झोपड्या पूर्व द्रुतगती मार्ग प्रकल्पात १६९४ झोपड्या बाधित होत आहेत. यातील १२८४ झोपड्यांची पात्रता निश्चिती झाली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

झोपडीधारकांना घरभाड्याचे ११६ कोटी रुपये वितरित

या प्रकल्पातील ३,२१८ रहिवाशांना दोन वर्षांचे भाडे आणि एका वर्षाच्या भाड्याचे पुढील तारखेचे धनादेश वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली. या रहिवाशांना घरभाड्यापोटी ११६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई