Join us  

शाळेसाठी आरक्षित जमिनीवरील घरे पाडा; जमीन मोकळी करा; म्हाडाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 4:21 PM

लोकशाहीदिनी १० अर्जांवर सुनावणी.

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील शाळेसाठीच्या आरक्षित जमिनीवर पडीक अवस्थेत असलेली २० घरे ४८ तासांत ताब्यात घेऊन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना म्हाडा मुख्यालयात सोमवारी आयोजित लोकशाहीदिनी दिले. यावेळी त्यांनी १० अर्जांवर सुनावणी दिली.

नूतन विद्यामंदिर संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयास दिलेल्या २० घरांबाबत आलेल्या अर्जावर सुनावणी देताना संजीव जयस्वाल म्हणाले, म्हाडाची ही जमीन शाळेसाठी आरक्षित आहे. या जमिनीवरील पडीक अवस्थेत घरे आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची दुरुस्ती करावी. ही घरे दुरुस्ती करण्यापलीकडे असतील तर ती पाडून जमीन मोकळी करा. तसेच गाळे हस्तांतरण प्रकरणामध्ये अर्जदार रामदास भोसले यांनी मालवणी मालाड येथील २००४ मध्ये म्हाडाची घेतलेली घरे कागदपत्रांची पूर्तता करूनही हस्तांतरित होत नसल्याचे सांगितले. 

उपनिबंधकांना दिले निर्देश - वैशाली वारंग यांच्या इंदिरानगर जोगेश्वरी एस.आर.ए. गृहनिर्माण सहकारी संस्थेत असलेल्या निवासी झोपडीबाबत पात्रता निश्चितीच्या प्रलंबित अर्जाबाबत अर्जदारास तत्काळ पात्र करावे. अनिवासी झोपडीच्या अर्ज प्रकरणी अर्जदारास अपात्र करावे, असेही निर्देश दिले आहेत. अर्जदार शकुंतला राजहंस-व्हटकर यांनी सांताक्रुझ पश्चिम येथे असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये त्यांचा मुलगा अमोल व्हटकर यांना सहयोगी सभासद करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित उपनिबंधकांना देण्यात आले.

भूखंड देण्याबाबत प्रस्ताव सादर करा - म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे पाचपाखाडी ठाणे येथील योजना कोड क्रमांक २३९ अंतर्गत अशोक परब यांना २०१४ मध्ये वितरित केलेल्या जमिनीचा ताबा अर्जदाराला कायदेशीर कार्यवाही करून १५ दिवसांत देण्यात यावा, असे आदेश देण्यात आले. या जमिनीवर अतिक्रमण झाले असल्यास ते पाडावे. जमिनीचे क्षेत्रफळ कमी आढळून आल्यास अर्जदाराला इतरत्र भूखंड देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

३२ अर्ज निकाली -  ८ जानेवारीला १५ अर्ज व १३ फेब्रुवारी रोजी १६ अर्ज प्रकरणी कार्यवाही केली आहे. आजतागायत ४१ अर्ज प्राप्त झाले असून, ३२ अर्ज निकाली काढले आहेत. नऊ अर्ज प्रलंबित असून, त्यापैकी ५ अर्ज इतर शासकीय आस्थापनांशी निगडित असल्याने त्यांच्याकडे कार्यवाहीसाठी हस्तांतरित केले आहेत.

टॅग्स :मुंबईम्हाडाशाळा