Join us  

'अशोक चव्हाणांना हटविण्याची मागणी केल्यानेच अध्यक्षपदावरुन माझी नियुक्ती रद्द'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 6:07 PM

राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.

ठळक मुद्देराज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.

मुंबई : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अद्यादेश काढण्यात आला आहे. त्यानंतर, या महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष पदावरुन अशोक चव्हाण यांना हटविण्याची मागणी लावून धरल्यामुळेच माझी अध्यक्षपदावरील नियुक्ती रद्द केल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. 

राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य, विशेष निमंत्रित यांच्या नियुक्त्या महायुतीच्या सरकारच्या काळात करण्यात आल्या होत्या. महामंडळाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाची दखल घेऊन राज्यात नवीन सरकारने त्यांना एक वर्ष आणखी काम करण्याची संधी दिली. त्यानंतर या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपणास कशामुळे हटविण्यात आले हे सांगितले. त्यावेळी, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुनच हे राजकारण झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवा ही मागणी लावून धरल्यामुळेच महामंडळ अध्यक्षपदाची नियुक्ती रद्द केली. लवकरच माजी मुख्यमंत्रीमुख्यमंत्री यांची भेट घेऊन भूमिका जाहीर करणार, असेही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.  

राज्यात 18 हजार तरुणांना रोजगार

महामंडळाची जबाबदारी नरेंद्र पाटील व संजय पवार यांच्यावर सोपविल्यानंतर गेल्या दोन वर्षांत राज्यात 18 हजार तरुणांना रोजगारासाठी 1 लाख कोटीचे विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दीड हजार तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी 117 कोटींचे वाटप केले.

संजय पवार म्हणतात

नियुक्त्या रद्दबाबत अद्याप महामंडळास कोणतेच पत्र आलेले नाही. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या विश्वासाने महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, त्यास पात्र राहून काम केले. भविष्यात पक्षप्रमुख देतील ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेन.- संजय पवार,उपाध्यक्ष, आण्णासाहेब पाटील महामंडळ

उद्धव ठाकरेंनीच केली होती नियुक्ती

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांना अध्यक्षपद बहाल केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाटील यांनी नागपूर येथे भेट घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांद्वारे राज्यातील युवक उद्योजक होण्यासाठी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर, त्यांनाच अध्यक्षपदावर पुन्हा नियुक्त करण्यात आले होते. तत्पूर्वी राज्य शासनाने विविध महामंडळे बरखास्त केल्याचे जाहीर केल्याने नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 12 डिसेंबर रोजी सादर केला होता. 

टॅग्स :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळशिवसेनामुंबईमुख्यमंत्री