दिवाळी सणासाठी ‘तयार’ किल्ल्यांना मागणी
By Admin | Updated: November 3, 2015 00:48 IST2015-11-03T00:48:17+5:302015-11-03T00:48:17+5:30
दिवाळीचा सण काही दिवसांवरच येवून ठेपला आहे. दिवाळीत मातीचे किल्ले तयार करण्यावर बच्चे कंपनीचा भर असतो. मातीपासून तयार केलेले किल्ले आकर्षणाचा विषय

दिवाळी सणासाठी ‘तयार’ किल्ल्यांना मागणी
खालापूर : दिवाळीचा सण काही दिवसांवरच येवून ठेपला आहे. दिवाळीत मातीचे किल्ले तयार करण्यावर बच्चे कंपनीचा भर असतो. मातीपासून तयार केलेले किल्ले आकर्षणाचा विषय असतो. खालापूर तालुक्यातील शेती नामशेष होवून औद्योगिकीकरण झाल्याने माती उपलब्ध होत नसल्याने बच्चे कंपनीची पावले पीओपीपासून तयार केलेले किल्ले विकत घेण्याकडे वळू लागली आहेत. यामुळे किल्ल्यांना मागणी वाढली असून किल्ले बनविणाऱ्या व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
दिवाळी जवळ येत असल्याने बच्चे कंपनीमध्ये किल्ल्यांबद्दल उत्सुकता वाढू लागली आहे. पूर्वी हे किल्ले माती, दगडांपासून बनविले जायचे परंतु आता या किल्ल्यांची जागा पीओपीपासून बनविलेल्या किल्ल्यांनी घेतली आहे. ग्रामीण भागात जरी लहान मुले किल्ले बनवीत असले तरी शहरात जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण तयार किल्ल्यांना पसंती दाखवत आहेत. वाढत चाललेल्या मागणीमुळे सध्या किल्ल्यांचे दरही वधारलेले आहेत.अशा तयार केलेल्या किल्ल्यांना चांगली मागणी असून त्यांची किंमत १०० रु पयांपासून १००० रु पयांपर्यंत आहे. हे किल्ले वजनाने हलके असल्याने बच्चे कंपनी हे किल्ले घेताना खूश होत आहेत. दिवाळीनंतर हे किल्ले शोभेची वस्तू म्हणून घरात ठेवता येत असल्याने अनेक जण हे किल्ले आवर्जून खरेदी करताना दिसतात. अनेकांची पसंती तयार किल्ल्यांकडे असल्याने कारागिरांच्या हाताला रोजगार मिळत असून चांगला नफा मिळत आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर असे व्यावसायिक दिवाळी सणाच्या १५ दिवस आधी येतात व यातूनच दिवसाला ५ ते ६ हजारांचा व्यवसाय होत असल्याचे किल्ले बनविणाऱ्या व्यावसायिकाने सांगितले. मातीचा तुटवडा व अपुरी जागा यामुळे बच्चे कंपनी तयार किल्ले खरेदी करताना दिसत आहेत. (वार्ताहर)