Join us  

Hathras Gangrape : उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची सेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 5:33 AM

Hathras Gangrape हाथरसमधील घटना, त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची केलेली अडवणूक, माध्यमांच्या प्रतिनिधींना रोखले जाणे हा लोकशाहीवरील बलात्कार असल्याची टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली

मुंबई : हाथरसमध्ये दलित मुलीवर झालेला बलात्कार, तिची हत्या आणि त्यानंतरचा घटनाक्रम बघता, उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करीत शिवसेनेने मुंबईत आंदोलन केले. शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांनी चर्चगेट स्थानकाबाहेर योगी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. खा.अरविंद सावंत, खा. अनिल देसाई, शिशिर शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात पाहावं तेव्हा राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांनी आता उत्तर प्रदेशबाबत बोलावे, असा टोला खा.सावंत यांनी भाजपला हाणला.

हाथरसमधील घटना, त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची केलेली अडवणूक, माध्यमांच्या प्रतिनिधींना रोखले जाणे हा लोकशाहीवरील बलात्कार असल्याची टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करून त्यांनी हाथरसच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन का बाळगले आहे, असा सवाल केला.तर, शिवेसनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी, हाथरसमधील घटनेप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करावा आणि मुंबई पोलिसांना त्या ठिकाणी तपासासाठी पाठवावे, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. 

टॅग्स :उत्तर प्रदेशहाथरस सामूहिक बलात्कार