जादा गाड्यांची मागणी वाढली

By Admin | Updated: August 18, 2014 21:36 IST2014-08-18T21:04:31+5:302014-08-18T21:36:23+5:30

रत्नागिरी विभाग : मुंबईकरांना आणण्यासाठी ८२ गाड्यांचे आरक्षण पूर्ण

The demand for more trains has increased | जादा गाड्यांची मागणी वाढली

जादा गाड्यांची मागणी वाढली

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असल्याने मुंबईकर आवर्जून गावाकडे येतात. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी येण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ६५ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले होते. मात्र, आता मागणी वाढली असून ८२ जादा गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.
दापोली आगारातून मुंबई, बोरिवली, ठाणे, भार्इंदर, कल्याण, नालासोपारा मार्गावर आठ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. खेड आगारातून बोरिवली, कल्याण, भांडुप, मुंबई, पुणे मार्गावर दहा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. चिपळूण आगारातून मुंबई, पुणे, चिंचवड, स्वारगेट, बोरिवली मार्गावर नऊ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. गुहागर आगारातर्फे भांडुप, परेल, ठाणे, विरार, विठ्ठलवाडी, बोरिवली, मुंबई मार्गावर १५ गाड्यांचे नियोजन केले आहे. देवरुख आगारातून स्वारगेट, बोरिवली, मुंबई मार्गावर आठ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
रत्नागिरी आगारातून बोरिवली, मुंबई, पुणे मार्गावर पाच, तर लांजा आगारातून मुंबई - बोरिवली मार्गावर सहा जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. राजापूर आगारातून बोरिवली, नालासोपारा मार्गावर दहा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय मंडणगड आगारातून बोरिवली, मुंबई, नालासोपारा, भार्इंदर, परळ मार्गावर अकरा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंडणगड, गुहागर आगारातून गाड्यांना मागणी वाढली आहे. दापोली, चिपळूण आगारातून किरकोळ स्वरूपात मागणी वाढल्याचे दिसून येते.
संबंधित आगारातून या गाड्या मुंबईतील आगारात जाऊन तेथून प्रवाशांना घेऊन गावाकडे परतणार आहेत. २४ आॅगस्टपासून १० सप्टेंबरपर्यंत या गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय रत्नागिरी विभागातर्फे मुंबई - गोवा महामार्गावर विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आली आहेत. गस्तीपथक तैनात करण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक आगारात माहिती कक्ष सुरू करण्यात येणार आहे. महामार्गावरील महत्त्वाच्या आगारांमध्ये कार्यशाळा सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या मुंबईकराना सुयोग्य व चांगली सेवा देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.
दरवर्षी गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांसाठी एस. टी.चे नियोजन करण्यात येते. आॅनलाईन आरक्षण सुविधा असल्याने एक महिन्यापूर्वीच आरक्षण सुविधा सुरु झाली आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांची परतीसाठी होणारी धावपळ लक्षात परतीच्या प्रवासाचेही नियोजन एस. टी. प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The demand for more trains has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.