रेल्वेत नोकरीच्या नावे १३ लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 11:19 IST2024-12-16T11:18:54+5:302024-12-16T11:19:55+5:30

बनावट संकेतस्थळांचाही वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

demand for rs 13 lakhs in the name of a job in the railways | रेल्वेत नोकरीच्या नावे १३ लाखांची मागणी

रेल्वेत नोकरीच्या नावे १३ लाखांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) मध्ये ड्रायव्हरची नोकरी देण्याच्या नावाखाली अक्षय साळवे या तरुणाकडून १३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी अक्षयला दहा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. अक्षयने आठ लाख रुपये दादर स्टेशनबाहेर संजय शुक्ला या व्यक्तीला दिले, तर दोन लाख रुपये बँकेत भरण्यात आले. या  फसवणुकीमध्ये रेल्वेच्या विरार कार शेडमध्ये टेक्निशियन ग्रेड तीन या पदावर कार्यरत असलेला संजय शुक्ला तसेच सबर्बन गार्ड असलेल्या अतुल तायडे यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक विभागीय चौकशी दरम्यान समजले आहे. यामध्ये बनावट संकेतस्थळांचाही वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

अक्षयला रेल्वेत पैसे भरून नोकरी मिळू शकते असे सांगण्यात आले. त्यानुसार अक्षयला अतुल तायडेने अर्ज भरण्यास सांगितले. काही दिवसांनंतर अक्षयला आरआरबी मुंबई रेल नेट या मेल आयडीवरून मेडिकल कॉल लेटर आणि मेडिकल फिटनेस लेटर मिळाले. हे लेटर अतुलने त्याच मेल आयडीवर पाठविण्यास सांगितले. तसेच कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हस्ताक्षर आणि अंगठा घेऊन काही कागदपत्रे दुसऱ्या मेल आयडीवर पाठविण्यास सांगितले. या सगळ्या प्रकारांमध्ये अतुलसोबत त्याचा भाऊ आशिष यानेसुद्धा मदत केल्याचा प्राथमिक चौकशीमध्ये उघड झाले आहे.  हे प्रकरण आरपीएफकडे असून, चौकशी सुरू आहे.

दोन वर्षांपासून प्रकार सुरू?

संजय शुक्ला याने दोन वर्षांपूर्वी दादरमध्ये अतुल आणि त्याचा भाऊ आशिष यांची भेट घेतली होती. यावेळी संजय शुक्ला याने  रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी १३ लाख भरावे लागतात, असे आशिषला सांगितले.  त्यानंतर संजयने अतुल आणि आशिषला रोहित उर्फ अमित सिंगला भेटण्यास सांगितले. यामुळे हा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असून, आणखी किती लोक अशा प्रकारे रेल्वेमध्ये भरती झाले आहेत, असा प्रश्न उपस्थित  केला जात आहे.

Web Title: demand for rs 13 lakhs in the name of a job in the railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.