Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर भविष्यात वाहने कुठे उभी करायची? नियमांत शिथिलता नकाे; BKC मधील प्रस्तावित बदलांविरोधात आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 11:11 IST

वाहतूककोंडी वाढण्याची भीती, बीकेसी हे आधीच मुंबईतील वर्दळीचे आणि दाटीवाटीचे व्यावसायिक केंद्र असून, येथील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेवर ताण आहे.

मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुलातील आर आणि जी ब्लॉकमध्ये भविष्यात बांधण्यात येणाऱ्या बांधकामांना पार्किंग क्षेत्रात शिथिलता देण्याबाबतचा प्रस्ताव मागे घेण्यात यावा. कारण जर पार्किंग क्षेत्र कमी झाले तर भविष्यात संबंधित भागातील वाहने रस्त्यांवर उभी करावी लागतील आणि पुन्हा जागेच्या प्रश्नासह वाहतूककोंडीचा प्रश्न वाढेल, असे म्हणत या प्रस्तावाला ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने  विरोध केला आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील विकास नियंत्रण नियमांमध्ये प्रस्तावित बदलांविरोधात आक्षेप नोंदवले आहेत. २० एप्रिल रोजी जारी केलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर, वॉचडॉग फाउंडेशनने एमएमआरडीएकडे भूमिका स्पष्ट केली आहे. 

‘अतिरिक्त बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन’

प्रस्तावित दुरुस्तीनुसार, बीकेसीच्या ‘आर’ आणि ‘जी’ ब्लॉकमध्ये अतिरिक्त बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पार्किंगच्या विद्यमान नियमांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत शिथिलता देण्याचा अधिकार दिला जाईल. मात्र, या निर्णयामुळे अडचणी निर्माण होतील.

बीकेसीत वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेवर ताण

बीकेसी हे आधीच मुंबईतील वर्दळीचे आणि दाटीवाटीचे व्यावसायिक केंद्र असून, येथील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेवर ताण आहे. अशा परिस्थितीत पार्किंगच्या बंधनांमध्ये सवलत दिल्यास पार्किंगची मोठी कमतरता निर्माण होईल, असे वॉचडॉगचे गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. पुरेशा पार्किंगच्या अभावामुळे वाहनचालक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अनियमितपणे वाहने उभी करतात. ज्यामुळे रस्त्यांची वहनक्षमता कमी होते. वाहतूककोंडी वाढते आणि पादचारी व प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. प्रस्तावित ५० टक्के सवलतीमुळे बीकेसीमध्ये वाहतूककोंडी आणखी वाढण्याची तसेच रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमण वाढण्याची शक्यता आहे.

‘पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे गरजेचे’

प्राधिकरणाने पार्किंगचे नियम शिथिल करण्याऐवजी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे, नियोजित पार्किंग उपाययोजना राबवणे आणि नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे वॉचडॉगचे म्हणणे आहे. या सर्व बाबींचा विचार करता प्रस्तावित बदल मागे घेण्याची आणि बीकेसीसारख्या भागात पार्किंग नियमांमध्ये कोणतीही शिथिलता न देण्याची मागणी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BKC Parking Relaxation Opposed: Concerns over Future Congestion and Infrastructure Strain

Web Summary : Watchdog Foundation opposes relaxed parking rules in BKC, fearing increased congestion. They argue existing infrastructure is already strained and relaxed rules would exacerbate parking shortages, leading to traffic chaos. Instead, they urge stronger infrastructure and enforcement.
टॅग्स :वाहतूक कोंडीपार्किंग