थ्रीडी लाइट्सच्या दप्तरांना मागणी

By Admin | Updated: June 15, 2016 02:40 IST2016-06-15T02:40:25+5:302016-06-15T02:40:25+5:30

मान्सूनच्या प्रतीक्षेत असणारे मुंबईकर सध्या शॉपिंगमध्ये बिझी आहेत. त्यात बच्चेकंपनीची शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या शाळेला लागणाऱ्या सामानाची तयारी प्राधान्याने सुरू आहे.

Demand for 3D lights | थ्रीडी लाइट्सच्या दप्तरांना मागणी

थ्रीडी लाइट्सच्या दप्तरांना मागणी

- चेतन कंठे, मुंबई

मान्सूनच्या प्रतीक्षेत असणारे मुंबईकर सध्या शॉपिंगमध्ये बिझी आहेत. त्यात बच्चेकंपनीची शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या शाळेला लागणाऱ्या सामानाची तयारी प्राधान्याने सुरू आहे. त्यासाठी यंदाही शहर-उपनगरातील मार्केट सज्ज झाली असून सध्या ‘आॅल सीझन’ वॉटरप्रूफ दप्तरे आणि थ्रीडी लाइट्सच्या दप्तरांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.
शहर उपनगरातील दादर, मस्जिद बंदर, क्रॉफर्ड मार्केट, जनता मार्केट, कुर्ला अशा सर्व ठिकाणी सध्या शॉपिंगसाठी मुंबईकरांची गर्दी दिसून येते आहे. त्यात प्राधान्याने लहान मुलांच्या शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात कोणती नवी उत्पादने आहेत, त्यातले वेगळेपण काय यासाठी पालकांची शोधाशोध सुरू आहे. यंदा बच्चेकंपनीला आकर्षित करण्यासाठी आॅल सीझन वॉटरप्रूफ आणि थ्रीडी लाइट्सच्या दप्तरांची मार्केट्समध्ये चलती आहे. लहानग्यांच्या हट्टापायी पालकही या दप्तरांच्या खरेदीला पसंती देत आहेत. याशिवाय, छोटा भीम, अँग्री बर्ड्स, बेनटेन, मिनीआॅन्स, मोटू-पतलू, बार्बी, निंजा हातोरी, मोगली-बगिरा अशा वेगवेगळ््या कार्टून्स कॅरेक्टर्सची दप्तरे बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे थ्रीडी डिझाइन्सच्या, विविधरंगी आणि वेगवेगळ्या माध्यमांत बनविलेली दप्तरे उपलब्ध आहेत.
सध्या होणाऱ्या दप्तर खरेदीविषयी विक्रेते राजेश मेहता यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० ते १२ टक्क्यांनी दप्तरांच्या किमती वाढल्या आहेत. मात्र त्याचा खरेदीवर कोणताच परिणाम झाला नसून याउलट अजूनही बाजार तेजीत आहे.

गेल्या वर्षी साधे दप्तर १५० ते २०० रुपयांपर्यंत मिळत होते. यंदा हीच दप्तरे ३०० रुपयांना मिळत आहेत, तर वॉटरप्रूफ दप्तराची किंमत ३५० ते ४५० च्या दरम्यान आहे. यातही जास्त दप्तरांचे कप्पे, आकार यावरही दप्तरांच्या किमतीत फरक दिसून येतो. शिवाय, काही दुकानांत दप्तर, पाण्याची बाटली, टिफिन बॅग असे साहित्याचे किट उपलब्ध आहे, मात्र याची किंमत ७०० पासून पुढे सुरू होते.

Web Title: Demand for 3D lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.