Join us

दिल्लीचे तिकीट गोव्यापेक्षा स्वस्त! खासगी बसभाडे तिप्पट, पर्यटकांची लूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:11 IST

बसचालकांनी प्रतिआसन ३ ते ५ हजार रुपये घेतल्याने आयत्यावेळी बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या खिशाला मोठा भुर्दंड पडला.

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारे गाठण्याचा पर्यटकांचा फसफसता उत्साह एन्कॅश करण्यासाठी खासगी बसचालकांनी  कोकणात - गोव्याला जाणाऱ्या खासगी बसभाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ केली. त्यामुळे मुंबई ते गोवा खासगी बसच्या भाड्याने सोमवारी दिल्लीच्या भाड्याशी स्पर्धा केली. बसचालकांनी प्रतिआसन ३ ते ५ हजार रुपये घेतल्याने आयत्यावेळी बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या खिशाला मोठा भुर्दंड पडला.

मुंबई ते गोवा मार्गावर धावणाऱ्या कोकण कन्या, तेजस, वंदे भारत आणि जनशताब्दी या नेहमीच्या गाड्यांची बुकिंग दोन महिन्यांपूर्वीच फुल्ल झाली. विमानांची तिकिटेही उपलब्ध नाहीत. जी उपलब्ध आहेत त्यांचे दर दुप्पट आहेत.  त्यामुळे ज्या प्रवाशांकडे स्वतःच्या वाहनाची सोय नाही, त्यांना खासगी बसेसचा पर्याय शोधावा लागला. पर्यटकांची अडचण ओळखून खासगी बसचालकांनी वाटमारीच केली. इतर वेळेस वातानुकूलित शयनयान गाडीचे मुंबई ते गोवा एक हजार रुपये असणारे तिकीट ३ ते ५ हजार  रुपयांना विकले गेले. मुंबई ते दिल्ली रेल्वेचे थर्ड एसीचे तिकीट २७०० रुपये आहे. त्यामुळे हे दर त्या तिकिटाच्या दराच्या पुढे गेले होते. मला गावी देवगडला जायचे होते; परंतु तिकिटाचे दर पाचपट आहेत, असे रुपेश लाड या प्रवाशाने सांगितले.

भाड्याचा भार मोठा-    मुंबई ते गोवा सर्वसाधारण तिकीट दर ८०० ते १०००, सध्या २५०० ते ५००० रु.- मुंबई ते महाबळेश्वर ५०० ते २५०० रु. - मुंबई ते लोणावळा ६०० ते २५०० रु. - मुंबई ते वैभववाडी ९०० ते १२०० रु. - मुंबई ते गुहागर ७००  ते १५०० रु. - मुंबई ते चिपळूण १००० ते ४००० रु. - मुंबई ते सावंतवाडी ९०० ते ३००० रु. 

तिकिटांच्या दरामध्ये झालेली ही वाढ निश्चितच जास्त आहे. हाच कमाईचा सीझन असल्याचे बसमालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते जे दर सांगतील तो आम्हा ग्राहकाला घ्यावा लागत आहे.     - मुकेश,  बुकिंग एजंट, दादर

यावर्षी आम्ही पहिल्यांदाच गोव्याला नववर्षाच्या स्वागतासाठी जायचे ठरवले. त्यासाठी हॉटेलची सर्व बुकिंगसुद्धा केली आहे. मात्र, तिकीट बुक केले नव्हते. खासगी ट्रॅव्हल्सवाले एका तिकिटाचे चार हजार रुपये घेत आहेत.     -प्रिया सातार्डेकर 

टॅग्स :प्रवासीव्यवसायपर्यटन