Join us  

शिवसेनेला ११५ ते १२० जागा सोेडण्याची दिल्लीची तयारी; युतीची चर्चा बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 2:52 AM

महायुतीमध्ये असलेल्या लहान मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याची सूचनाही भाजपच्या श्रेष्ठींनी राज्याच्या नेत्यांना केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

यदु जोशीमुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ११५ ते १२० जागा सोडा, त्यापेक्षा अधिक नको, असा निरोप दिल्लीहून आल्याने राज्यातील भाजप नेत्यांची अडचण झाली आहे. पक्षश्रेष्ठींकडून आलेला निरोप शिवसेनेपर्यंत पोहोचविण्यात आला असून, त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, यावर युतीचे भवितव्य अवलंबून असेल.

महायुतीमध्ये असलेल्या लहान मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याची सूचनाही भाजपच्या श्रेष्ठींनी राज्याच्या नेत्यांना केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शिवसेनेला १२० ते १२६ पर्यंत जागा सोडण्याची तयारी राज्यातील भाजपच्या नेतृत्वाने शिवसेनेशी चर्चा करताना दर्शविली होती. सन्मानाने युती करायची, तर शिवसेनेला १२६ जागा द्यायला हव्यात, अशी भूमिका राज्यातील भाजपच्या नेतृत्वाने श्रेष्ठींकडेही मांडली होती.

मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव यांनी मुंबईत दोन दिवस तळ ठोकून संपूर्ण बारीकसारीक तपशील जाणून घेतल्यानंतर, दिल्लीत श्रेष्ठींशी चर्चा केली आणि त्यानंतर शिवसेनेला १२० पर्यंत जागा सोडाव्यात, अशी भूमिका घेण्याचे ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. १२६ जागांवर शिवसेनेचे समाधान करता येईल, असे राज्यातील भाजपच्या नेतृत्वाला वाटत होते. मात्र, श्रेष्ठींनी ११५ ते १२० जागा शिवसेनेला सोडा, असे म्हटले असल्याचे त्यांची अडचण झाली आहे. १२६ जागा शिवसेनेला दिल्या पाहिजेत हे श्रेष्ठींच्या गळी उतरविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

बुधवारी दिवसभराच्या या घडामोडीत युतीची चर्चा काहीशी बॅकफूटवर गेली. मात्र, रात्री उशिरा वा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती अशा लहान मित्रपक्षांना मिळून १८ जागा सोडाव्यात, असे निर्देश भाजपच्या श्रेष्ठींनी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेला समजा ११७ जागा सोडण्यात आल्या, तर १७१ जागा उरतात. त्यातील १८ लहान मित्रपक्षांना दिल्या, तरी भाजपला लढण्यासाठी १५३ जागा मिळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा १३ सप्टेंबरपासून सुरू होत असून, त्याच्या आधी युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.काही गोष्टी आपणच केल्या पाहिजेत : उद्धव२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वचननाम्यात मी एक योजना दिली होती. ती सरकारला दाखवली. पण पुढे काहीच झाले नाही, असे सांगत ‘काही गोष्टी आपल्या आपणच केल्या पाहिजेत’, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी ठाणे येथे एका कार्यक्रमात केले.

टॅग्स :शिवसेनाभाजपा