दिल्लीतील मॉडेलने घातला गंडा
By Admin | Updated: October 9, 2015 03:09 IST2015-10-09T03:09:07+5:302015-10-09T03:09:07+5:30
पेइंगगेस्ट म्हणून ठेवलेल्या दिल्लीतील एका मॉडेलने मित्रांच्या मदतीने मुंबईतील दोन मॉडेल्सना गंडा घातल्याची घटना बांगूर नगर येथे मंगळवारी घडली. नेहा नानगिजा असे आरोपी

दिल्लीतील मॉडेलने घातला गंडा
मुंबई : पेइंगगेस्ट म्हणून ठेवलेल्या दिल्लीतील एका मॉडेलने मित्रांच्या मदतीने मुंबईतील दोन मॉडेल्सना गंडा घातल्याची घटना बांगूर नगर येथे मंगळवारी घडली. नेहा नानगिजा असे आरोपी मॉडेलचे नाव असून तिच्यासह तिघांविरोधात बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गोरेगाव येथील एका इमारतीत राहणाऱ्या रेणू सिरोनी आणि तन्वी गुप्ता या दोघीही मॉडेल्स आहेत. गेल्या महिन्यात एका फॅशन शोनिमित्त त्या दिल्लीला गेल्या होत्या. तेथे त्यांची भेट नानगिजा हिच्याशी झाली. त्यामुळे दोघीही एकमेकांच्या संपर्कात आल्या. सुरुवातीपासून मुंबईचे आकर्षण असलेली नानगिजा काही दिवसांपूर्वी मुंबईत आली होती. मुंबईत कोणीही ओळखीचे नसल्याने गुप्ता आणि सिरोनीने तिला मदत म्हणून आपल्यासोबत राहण्यास सांगितले.
एका शूटिंगसाठी गुप्ता आणि सिरोनी २४ सप्टेंबर रोजी गोवा येथे रवाना झाल्या. अशात घरात एकटी असल्याची संधी साधून नानगिजाने घरातील दागिने आणि रोकड लंपास करून पळ काढला. चार दिवसांनी घरी परतलेल्या दोघींना घरातील सामान चोरी झाल्याचे समजताच त्यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवर बांगूर नगर पोलिसांनी नानगिजासह तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मॉडेल मैत्रीण आणि मित्राच्या मदतीने नानगिजाने घरातील पावणेदोन लाखांचा ऐवज चोरी केल्याचे समोर येत असल्याने त्यानुसार पोलिसांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)