Join us  

...तर सरकार बरखास्त करणार आहात काय?; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 9:12 AM

Delhi Election - ‘हमाम में सब ढोंगी है’ अशीच सध्या एकूण राजकारणाची स्थिती आहे. ‘केजरीवाल हे आतंकवादी आहेत’ असादेखील भाजपचा प्रचाराचा मुद्दा आहे.

मुंबई -  भारतीय जनता पक्षाने देशाच्या पंतप्रधानांना इतके खाली आणू नये. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांना मतदानातून शिक्षा करा. मोदी यांचे म्हणणे दिल्लीच्या मतदारांनी उद्या ऐकले नाही तर लाखो मतदार हे देशद्रोही आहेत असे ठरवून नवे येणारे सरकार ते बरखास्त करणार आहेत काय? एकतर अशा चिखलात देशाच्या पंतप्रधानांनी उतरू नये व उतरलेच आहात तर संयम राखा. राजकारण सगळेच करतात, पण विकासाच्या मुद्दय़ावर फार कमी बोलतात असा टोलाही सामना अग्रलेखातून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना काढला आहे. 

दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या ‘फुलोत्पादना’ला आमच्या शुभेच्छा! पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना ‘लय भारी’ पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही असंही सामनातून भाजपाला बजावलं आहे. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी जिवाची बाजी लावली आहे. महाराष्ट्र हातचे गेले, झारखंडमध्ये दारुण पराभव झाला. त्यामुळे दिल्लीत तरी झेंडा फडकवावा, असे भाजपाला वाटत असेल तर त्यात चुकीचे काय? 
  • केजरीवाल यांच्या भूमिका, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात, पण हाती मर्यादित सत्ता असताना, केंद्राने वारंवार अडथळे आणूनही आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा याबाबतीत त्यांच्या सरकारचे काम आदर्श आहे. 

  • केजरीवाल सरकारच्या त्या कार्याचा आदर्श घेऊन पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने हे ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवायला हरकत नव्हती व त्या कामी केजरीवाल यांच्या ‘व्हिजन’चा वापर देशभर करायला हवा होता, पण प्रचारातील एकतर्फी झोडपेगिरी आणि उटपटांगगिरी इतक्या थराला पोहोचली की इतर विषय राहिले बाजूला, केजरीवाल यांनाच खोटे ठरविण्यासाठी सारी यंत्रणा राबवली जात आहे. 
  • एखाद्या राज्यात कुणी चांगले काम करीत असेल व ते राज्य आपल्या विचाराचे नसेल तरीही चांगल्याला चांगले म्हणणे व ते चांगले काम पुढे घेऊन जाणे हेच देशाच्या लोकनायकाचे कर्तव्य असते. पण ही मनाची दिलदारी आज उरलीय कुठे? दिल्लीची राजकीय व्यवस्था ही केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. 
  • दिल्लीतील महानगरपालिका भाजपच्या मुठीत आहे. केंद्राच्या वतीने नायब राज्यपाल दिल्लीचा कारभार पाहतात. म्हणजे लोकनियुक्त सरकारला टपल्या मारतात. अशा परिस्थितीत एखादे सरकार काम करते व नागरी सुविधांच्या बाबतीत कीर्तिमान प्रस्थापित करते हे महत्त्वाचे. 
  • आमचे राज्यकर्ते अमेरिका, फ्रान्स, युरोपादी राष्ट्रांतील एखाद्या व्यवस्थेने प्रभावित होऊन ते ‘मॉडेल’ हिंदुस्थानात राबवतील, त्याचा डांगोरा पिटतील, पण दिल्लीतील सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या याचे कौतुक करताना त्यांच्या पोटात सर्जिकल स्ट्राइकचा गोळा का उठावा तेच कळत नाही. 
  • पाच वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी जी वचने दिली ती पूर्ण झाली व त्याबद्दल श्री. मोदी किंवा श्री. शहा यांनी केंद्रीय सरकारतर्फे केजरीवाल यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कारच करून नवा पायंडा पाडायला हवा. पण ते न करता भाजपचे बडे नेते व मंत्री दिल्लीत निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू विरुद्ध मुसलमान असा राजकीय चिखल तुडवीत बसले आहेत. 

  • केजरीवाल हनुमानभक्त आहेत. ते शनिवारी हनुमान मंदिरात गेले आणि तेथे त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. मात्र भाजपला ते आवडले नाही. एवढेच नव्हे तर हे सर्व ढोंग आहे अशी आगपाखड त्यांनी केली. खरे तर श्रीरामाशिवाय हनुमान अपूर्ण आहे आणि ढोंगाबाबतच बोलायचे तर त्याबाबत कोणी कोणाला शिकवू नये. 
  • ‘हमाम में सब ढोंगी है’ अशीच सध्या एकूण राजकारणाची स्थिती आहे. ‘केजरीवाल हे आतंकवादी आहेत’ असादेखील भाजपचा प्रचाराचा मुद्दा आहे. ते आतंकवादी असल्याचे पुरावे असतील तर सरकार हात चोळत का बसले आहे? कारवाई करायला हवी.
टॅग्स :दिल्ली निवडणूकआपभाजपाशिवसेनापंतप्रधान