Join us  

Delhi Election Result : दिल्लीच्या विजयानंतर मुंबई महापालिकेवर आपची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 9:50 PM

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढविणार

 मुंबई : दिल्ली विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केल्यानंतर आम आदमी पार्टीचा आत्मविश्वास दुणावला आहे. दिल्लीतील विजयानंतर आपने आता मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळविला आहे. मुंबईसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्रआपने केली आहे. 

दिल्लीतील विजयाने देशभरातील आपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. या निवडणुकांनी धाम्रिक तेढ, विद्वेष आणि एखाद्या विशिष्ट नेत्याला केंद्रीत राजकारण नाकारले आहे. आपने विकासाचे राजकारण केले. आपच्या प्रागतिक आणि विकासाभिमुक कामाची पावती दिल्लीतील विजयाने मिळाली आहे. या विजयानंतर देशभरातून अनेक लोकांनी आपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीतील विकासाचे मॉडेल देशभर आपापल्या ठिकाणी राबविण्याची लोकांची इच्छा आहे. त्यामुळे समविचारी लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी आपने विशेष हेल्पलाईन नंबर सुरू केल्याची माहिती आपच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी दिली. 

महाराष्ट्रात आगामी काळातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आप आपले उमेदवार उभे करणार आहे. विशेषत: मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आमची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे आपने स्पष्ट केले. दिल्लीतील विजयानंतर पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात जोरदार जल्लोष करण्यात आला. मध्यंतरी पक्षापासून दुरावलेलेल कार्यकर्तेसुद्धा पक्ष कार्यालयाबाहेरील जल्लोषात सहभागी झाले. आपच्या विजयाबद्दल पारोमिता गोस्वामी म्हणाल्या की, राष्ट्रवाद म्हणजे हिंदू-मुस्लिम नव्हे तर शासकीय शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण, सर्वसामान्य माणसांना आरोग्याच्या सुविधा, पिण्यासाठी मुबलक आणि शुद्ध पाणी देणे. हाच खरा राष्ट्रवाद असून आपने दिल्लीत हाच बदल घडवून खरा राष्ट्रवाद जोपासला आहे. 

टॅग्स :आपदिल्ली निवडणूकमहाराष्ट्रमुंबई महानगरपालिकानिवडणूक