‘केंद्राच्या जागेवरील झोपडपट्ट्या हटविण्याचा डाव’
By Admin | Updated: January 25, 2017 05:09 IST2017-01-25T05:09:37+5:302017-01-25T05:09:37+5:30
केंद्र सरकारच्या जमिनीवरील २०१० सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा कायदा आहे. पण...

‘केंद्राच्या जागेवरील झोपडपट्ट्या हटविण्याचा डाव’
मुंबई : केंद्र सरकारच्या जमिनीवरील २०१० सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा कायदा आहे. पण राज्यातील व महापालिकेतील भाजपा, शिवसेना युतीचे सरकार मात्र झोपड्या हटवून जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे म्हणाले की, मुंबईत केंद्र सरकारच्या जागेवर सुमारे १० लाख झोपड्या आहेत. यात जोगेश्वरी पूर्वेला रेल्वेच्या जागेत इंदिरानगर झोपडपट्टी आहे. १९७०पासून अस्तित्वात असलेल्या येथील झोपड्यांना २००६ साली नोटिसा देण्यात आल्या. न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडण्यात न आल्याने २०१६ला न्यायालयाने या झोपड्या हटविण्याचे आदेश दिले. याच आदेशाचा हवाला देत मुंबईतील अन्य झोपड्या हटविण्याचा कार्यक्रम राबविला जाऊ शकतो. गरिबांच्या झोपड्या हटवून त्या धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा डाव शिवसेना, भाजपाने आखल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केला. (प्रतिनिधी)