मुंबई : बेस्ट वाचवण्याचे आवाहन करत शिवसेनाप्रणीत कामगार संघटनांनी बेस्ट महाव्यवस्थापक आणि मनपा आयुक्तांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी शुक्रवारी, ६ जुलै रोजी मुंबई महापालिका मुख्यालयाला घेराव घालण्याचा इशारा मुंबई इलेक्ट्रिक वर्कर युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. या मोर्चात ५ हजार कामगार महापौरांना साकडे घालून महाव्यवस्थापक व आयुक्तांना हटवण्याचा ठराव मंजूर करण्याची मागणी करतील.गायकवाड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून आयुक्त आणि महाव्यवस्थापक संगनमताने बेस्ट समिती आणि मनपात सत्तेवर असलेल्या शिवसेनेला बदनाम करण्यासाठी योग्य व अचूक निर्णय घेत नाहीत. नियोजन आणि निर्णयाचा अभाव असल्यामुळे बेस्ट उपक्रम व बेस्ट कामगार अडचणीत सापडला आहे. म्हणूनच बेस्ट उपक्रम आणि कामगाराला वाचवण्यासाठी मनपा आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांना हटवण्याची मागणी करत शिवसेनाप्रणीतसंघटना एकवटल्या आहेत. त्यासाठी बेस्ट कामगार सेना, मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, बेस्ट कामगारक्रांती संघ यांमधील सदस्य कामगार मनपा मुख्यालयावर मोर्चाद्वारे धडकतील. सुमारे ५ हजारांहूनअधिक कामगार या मोर्चात सामील होतील.बेस्ट उपक्रमाच्या वीजपुरवठा विभागाला २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ साली ८०० कोटी व त्यापेक्षा जास्त निव्वळ नफाझाल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.गायकवाड म्हणाले की, कामगारांच्या गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढ व सोयी-सवलतीच्या करारासाठी मागणीपत्रावर चर्चा करून निर्णय घेतले जात नाहीत. नादुरुस्तकेएलजी पद्धतीचा वापर केल्यामुळे बेस्टच्या वीजपुरवठा विभागाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाल्याचाही गायकवाड यांचा आरोप आहे. त्यामुळे दोषयुक्त पद्धत रद्दकरून बेस्टचा तोटा कमी करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.सेवेवर परिणाम होणार नाही!बेस्ट कामगारांच्या मोर्चात ५ हजारांहून अधिक कामगार सामील होणार असले, तरी त्याचा बस सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले की, सकाळ आणि रात्रपाळीतील कामगार दुपारी होणाऱ्या या मोर्चात सामील होतील. याउलट दुपारच्या सत्रातील कामगार सेवा प्रदान करतील. त्यामुळे मुंबईकरांवर या मोर्चाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.ट्रायमॅक्स मशीन खरेदीचा घोळअवघ्या ४ कोटी रुपये खर्च असलेल्या तिकीट छपाईला पर्याय म्हणून बेस्ट प्रशासनाने २५ कोटी रुपये खर्च करून ट्रायमॅक्स मशीन खरेदीचे कंत्राट दिले. या मशीनही नादुरुस्त असल्याने बेस्टचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप सुहास सामंत यांनी केला. आधीच्या महाव्यवस्थापकांनी घेतलेल्या या निर्णयावर नव्या महाव्यवस्थापकांनी आक्षेप घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे नियोजन आणि निर्णयाच्या अभावामुळे बेस्ट बुडवण्याचा कारभार प्रशासन करत असल्याचे सामंत यांचे म्हणणे होते.
बेस्ट महाव्यवस्थापक, मनपा आयुक्तांना हटवा; कामगार संघटनांचे महापौरांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:29 IST