‘नयना’च्या विकास नियमावलीस विलंब

By Admin | Updated: October 27, 2014 00:32 IST2014-10-27T00:32:50+5:302014-10-27T00:32:50+5:30

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात नयना क्षेत्राच्या विकास नियमावलीस विलंब होत असल्याने या परिसरात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे

Delay in development rules of 'Nayana' | ‘नयना’च्या विकास नियमावलीस विलंब

‘नयना’च्या विकास नियमावलीस विलंब

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात नयना क्षेत्राच्या विकास नियमावलीस विलंब होत असल्याने या परिसरात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. स्वस्त घरांच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले आहे.
विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील २५ किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या क्षेत्राचा विकास प्रस्ताव आणि विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे या परिसरात कोणतेही बांधकाम किंवा विकास प्रकल्प राबविताना सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच स्थानिक ग्रामपंचायत आणि स्थानिक प्राधिकरणाला बांधकाम परवानगी देण्याचे असलेले पूर्वीचे अधिकार सुध्दा काढून घेण्यात आले आहेत. मात्र भूमाफियांनी या सर्व आदेशांना केराची टोपली दाखवत बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभारून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे या भूमाफियांना अटकाव करण्याचे सिडकोचे सर्व प्रयत्न तोटके ठरताना दिसत आहेत. दरम्यान, सिडकोने काही महिन्यापूर्वी विकास नियमावलीचा आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून दिला आहे. मात्र शासनाकडून त्यास मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याने या क्षेत्राच्या विकासाला खीळ बसली आहे. असे असले तरी निवडणूक आचारसंहितेमुळे विकास नियंत्रण नियमावलीची मान्यता रखडली होती. मात्र आता राज्यात नव्याने सत्तेवर येणाऱ्या सरकारकडे या विकास नियंत्रण नियमावलीच्या मंजुरीसाठी पुन्हा जोमाने पाठपुरावा केला जाईल, असे सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Delay in development rules of 'Nayana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.