देहरंग धरणाची उंची वाढणार!

By Admin | Updated: June 18, 2015 00:53 IST2015-06-18T00:53:54+5:302015-06-18T00:53:54+5:30

पनवेल नगरपालिका आपल्या मालकीच्या देहरंग धरणाची उंची वाढवणार आहे. पाण्याची साठवणूक क्षमता वाढविण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Dehang dam height increase! | देहरंग धरणाची उंची वाढणार!

देहरंग धरणाची उंची वाढणार!

पनवेल : पनवेल नगरपालिका आपल्या मालकीच्या देहरंग धरणाची उंची वाढवणार आहे. पाण्याची साठवणूक क्षमता वाढविण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता एका एजन्सीची नियुक्ती करून सर्वेक्षणही करण्यात आले आहे. एजन्सीने पालिकेकडे अहवाल सादर केला असून तो अभिप्रायाकरिता पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. पाटबंधारे खात्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
माथेरानच्या डोंगर पायथ्याशी पनवेल नगरपरिषदेच्या मालकीची २७७ हेक्टर जमीन आहे. यातील १२५ हेक्टर क्षेत्रावर देहरंग धरण आहे. पनवेल नगरपालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या या धरणाची पाणी साठवणूक क्षमता ७०० एमएलडी पाणी आहे. या ठिकाणाहून पनवेल शहराला एप्रिल महिन्यापर्यंत दररोज १२ एमएलडी पाणीपुरवठा केला गेला. वास्तविक पाहता पनवेल शहराची गरज दुप्पट आहे. म्हणून पालिका एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोकडून पाणी विकत घेऊन ते पनवेलकरांना पुरवले जाते.
प्रशासनाला देहरंग धरणाचे पाणी सोडून अतिरिक्त ५० लाख रुपये खर्च येतो. मात्र पाणीपट्टी केवळ ४० लाख जमा होते. म्हणजेच दरमहा १० लाखांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागत असून सुमारे दीड कोटींपेक्षा जास्त पाणीबिल वर्षाला अदा करावे लागते. त्यांचा परिणाम विकासकामावर होत असून पाण्याने अनेकदा पालिकेला कर्जबाजारी केले आहे.
पाणीबिलापोटी एमजेपीचे कोट्यवधी रुपये पालिकेने थकवले होते. त्यामुळे या यंत्रणेने कित्येकदा पाणीपुरवठा खंडित करण्याच्या धमक्याही दिल्या, तेव्हापासून पनवेल शहराला वर्षभर पाणीपुरवठा करण्याकरिता मुबलक पाण्याची उपलब्धता असण्याबाबत चर्चा झाल्या. त्यातून देहरंग धरणाची उंची वाढविण्याचा मुद्दा पुढे आला.
याबाबतच्या सर्वेक्षणाकरिता गुजरात येथील मे. वाल्कोस लि. या कंपनीची नियुक्ती करण्यात आली. कंपनीने धरण परिसराचा अभ्यास करून पालिकेला अहवाल सादर केला आहे. धरणाची उंची वाढविण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ४.७० टक्के फी एजन्सीला जाणार आहे. हा अहवाल अभिप्रायाकरिता पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या विभागाकडून त्यामधील सर्व तांत्रिक बाबी तपासून या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)

देहरंग धरणातील जलसाठा वाढविण्याकरिता पालिका उपाययोजना करीत आहे. सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. पाटबंधारे विभागाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून या विभागाच्या अभियंत्यांनी देहरंग धरणाची पाहणी केली आहे. पाटबंधारे विभागाकडून अहवालास संमती दर्शवण्यात आल्यास, विषय सभागृहासमोर मांडण्यात येईल.
- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका

Web Title: Dehang dam height increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.