Join us  

बिग बॉसच्या सेटसाठी फिल्मसिटीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड; अधिकारीही अनभिज्ञ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 7:55 PM

एकीकडे सर्वत्र तापमान वाढत असतांना,वृक्ष लागवड करा असा संदेश सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे गोरेगाव पूर्व फिल्मसिटीत बिग बॉसच्या शूटिंगच्या सेटसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : एकीकडे सर्वत्र तापमान वाढत असताना वृक्ष लागवड करा, असा संदेश सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे गोरेगाव पूर्व फिल्मसिटीत बिग बॉसच्या शूटिंगच्या सेटसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे येथील अधिकारी अनभिज्ञ असून येथे वृक्षतोड कशी झाली हे त्यांना सुद्धा माहीत नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,गेल्या 29 एप्रिलला रात्री येथील सुमारे 10 पुरातन वृक्ष चक्क बिग बॉसच्या शूटिंगच्या सेटसाठी तोडण्यात आली. या आधी देखील येथे चालणाऱ्या शूटिंगचे सेट उभारण्यासाठी वृक्षतोड करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली होती.

फिल्मसिटी येथे शिवमैदान असून याठिकाणी इंडोमॉल साइन इंडिया या कंपनीला बिग बॉस सिरियलच्या शूटिंगसाठी सेट उभारण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांनी येथे वृक्षतोड करून सेट उभारला असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते राजकिरण साळवे यांनी फिल्मसिटीच्या सल्लागार अधिकारी(स्टुडियो मॅनेजर) सुनीता शेलार यांच्याकडे केली असून आरे 100 नंबरला तक्रार केली आहे. मात्र अजून यावर काही कारवाई करण्यात आलेली नसल्याने उद्या आरे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

याबाबत शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, जर एखाद्या सोसायटीने जर साधी झाडाची फांदी तोडली तर त्यावर महापालिका गुन्हा दाखल करते. मग फिल्मसिटीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वृक्षतोडीवर तेथील अधिकाऱ्यांचे नियंत्रण कसे नाही? अधिकारी व सुरक्षारक्षक शुटिंगचे सेट उभारण्यासाठी कानाडोळा कसा करतात?, असा सवाल त्यांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. येत्या पावसाळी अधिवेशनात आपण विधानसभेत याबाबत आवाज उठवणार असल्याचे प्रभू यांनी ठामपणे सांगितले.

याशिवाय, फिल्मसिटीचे सहसंचालक निवृत्ती मराले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दि, 29 एप्रिलच्या रात्री येथे 3 झाडे तोडण्यात आली. याबाबत येथील शूटिंगचे सेट उभारणाऱ्या इंडोमॉल साइन इंडिया या कंपनीकडे आम्ही खुलासा मागितला आहे. वृक्षतोड कोणी केली हे या कंपनीला देखील माहिती नसून उलट येथे वृक्षतोड झाल्याची तक्रार या कंपनीने आरे पोलीस ठाण्यात केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रमुंबई