महावितरण अधिका-यांची मनमानी
By Admin | Updated: December 16, 2014 01:47 IST2014-12-16T01:47:18+5:302014-12-16T01:47:18+5:30
खारघरमध्ये महावितरण अधिकाऱ्यांनी एक सोसायटीमधील विजपुरवठा सोमवारी सात तास बंद ठेवला होता.

महावितरण अधिका-यांची मनमानी
नवी मुंबई : खारघरमध्ये महावितरण अधिकाऱ्यांनी एक सोसायटीमधील विजपुरवठा सोमवारी सात तास बंद ठेवला होता. रहिवाशांना दिवसभर वेठीस धरल्यामुळे संतप्त महिलांनी कार्यालयामध्ये जावून नाराजी व्यक्त केल्यानंतर सायंकाळी विजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
सेक्टर ४ मधील अर्जुन गृहनिर्माण सोसायटीमधील विजपुरवठा सकाळी ११ वाजता बंद झाला. विज का गेली याविषयी रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये चौकशी केली असता साहेबांनी सुचना दिल्या आहेत तुम्ही त्यांच्याशीच बोला असे सांगण्यात आले. दिवसभर रहिवाशांना वेठीस धरण्यात आले होते. अखेर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास महिलांनी कार्यालयामध्ये जावून याविषयी विचारना केली.परंतू तेथील अधिकाऱ्यांनी आम्ही काही केलेले नाही तुम्ही सेक्टर १२ मध्ये जावून साहेबांना भेट असे सांगितले. महिलांनी तेथे जावून अतिरिक्त कार्यकारी अभियंता माणीक राठोड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यानंतर सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास विजपुरवठा पुर्ववत करण्यात आला.
रहिवाशांना वेठीस धरण्याविषयी सेक्टर ४ मधील अधिकारी शकील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही काहीही केलेले नाही याविषयी अतिरिक्त कार्यकारी अभियंता माणीक राठोड माहिती देतील असे स्पष्ट केले. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र मुद्दाम विजपुरवठा खंडीत केला नसल्याची सारवासारव केली व आम्हाला सदर सोसायटीत काम करण्यास अडथळा निर्माण केला जात असल्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला. रहिवाशांनी मात्र या विषयी तिव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वेठीस धरण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)