आदिवासी पाड्यांवर दिपोत्सव उत्साहात
By Admin | Updated: October 22, 2014 00:20 IST2014-10-22T00:20:54+5:302014-10-22T00:20:54+5:30
बोर्डी परिसरातील बँक आणि स्वस्त धान्य दुकानांसमोर आदिवासींच्या लांबच-लांब रांगा दिसून येत आहेत.

आदिवासी पाड्यांवर दिपोत्सव उत्साहात
बोर्डी : बोर्डी परिसरातील बँक आणि स्वस्त धान्य दुकानांसमोर आदिवासींच्या लांबच-लांब रांगा दिसून येत आहेत. दिवाळी सणापूर्वी घरात लक्ष्मीच्या आगमनाने येथील आदिवासी सुखावला असून पाड्यावर दिपोत्सवाचा उत्साह दिसतो आहे.
डहाणू, तलासरी हा आदिवासी भाग मजूरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने पावसाळ्यातील चार महिने वगळता हजारो आदिवासी वीटभट्टी, मच्छीमार खलाशी, शेतमजुरीकरीता घराबाहेर असतो. कुटूंबातील लहान मुले व वृद्धांचा सांभाळ महिला करतात. चरितार्थ आणि सणासुदीला कुटूंब प्रमुख हस्ते, परहस्ते पैसे पाठवतो. मात्र वेळेवर पैसे न मिळाल्याने कुटूंबाला सणाचा आनंद लुटता येत नाही. दरम्यान गाव तेथे बँक या धोरणातून बोर्डीसह परिसरातील वेवजी, घोलवड, कोसबाड, चिखले इ. आदिवासी गावामध्ये अनेक बँकांनी शाखा उघडल्या आहेत. त्याचा फायदा आदिवासींना होताना दिसत आहे. श्रावण बाळ निवृत्त योजना, इंदिरा गांधी सिनियर सिटीजन योजना, गॅस अनुदान, मनरेगा, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन इ. पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. दिवाळी सणापूर्वी लाभार्थ्यांचे पैसे बँक खात्यात जमा झाल्याने बँकासमोर गर्दी दिसत आहे. मनिट्रान्सफर सुविधा हाताळण्यात आदिवासी सरावला आहे. दिवाळीनिमित्त स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर इ. धान्य वितरीत केले जात आहे. येथेही लांबच लांब रांगा दिसत आहेत.दरम्यान दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याकरीता पैसे आणि धान्याच्या रुपाने घरात लक्ष्मीच्या आगमनाने आदिवासी सुखावला आहे. तथापि आदिवासी गावपाड्यावर खऱ्या अर्थाने दिपोत्सवाची प्रचिती येत आहे.