दीपालीनगरचा समांतर की लूटमार रस्ता?
By Admin | Updated: September 18, 2014 00:57 IST2014-09-18T00:57:20+5:302014-09-18T00:57:20+5:30
दीपालीनगरचा समांतर की लूटमार रस्ता?

दीपालीनगरचा समांतर की लूटमार रस्ता?
इंदिरानगर : छान हॉटेल ते दीपालीनगर दरम्यानचा समांतर रस्ता हा लूटमारीचा रस्ता बनला असून, गेल्या महिनाभराच्या कालावधीत तिघांना जबर मारहाण करून लुटल्याच्या घटना घडल्या आहेत़ या रस्त्यावरील बंद पथदीपांमुळे अंधाराचे साम्राज्य असते़ विशेष म्हणजे, या घटनांमधील संशयित मोकाट असून, रात्री आठ वाजेनंतर या रस्त्याने जाण्यास नागरिक घाबरत आहेत़ या ठिकाणी मनपाने पथदीप बसवावे व पोलिसांनी गस्त ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़
मुंबई नाका ते दादासाहेब फाळके स्मारक यादरम्यान विविध उपनगरे आहेत़ या उपनगरांमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक राहतात़ दिवसभरातील शहरातील नोकरी-व्यवसाय आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी छान हॉटेल ते दीपालीनगर या समांतर रस्त्याचा वापर वाहनधारक तसेच पादचाऱ्यांकडून केला जातो़ याबरोबरच दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगरसह परिसरातील नागरिक नेहमीच या समांतर रस्त्यावरून ये-जा करतात़
छान हॉटेल ते दीपालीनगरदरम्यान पथदीप नसल्याने या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते़ त्यातच दीपालीनगर कॉर्नरजवळ एका बांधकाम व्यावसायिकाने संरक्षक भिंत म्हणून मोठ-मोठे पत्रे उभे केले आहेत़ या महिनाभरात अंधार व पत्र्यांचा फायदा घेऊन चोरट्यांनी तिघांना जबर मारहाण करून लूटमार केल्याची घटना घडली आहे़ विशेष म्हणजे, या परिसरालगत असलेल्या झोपडपट्टीतील सराईत गुन्हेगार ही लूट करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़
या लुटीच्या सर्व घटना रात्री सव्वाआठ ते सव्वादहा वाजेच्या दरम्यान घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे़ मनपा प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पथदीप बसवावे तसेच इंदिरानगर पोलिसांनी झोपडपट्टीतील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी केली जात आहे़ (वार्ताहर)