Join us  

Deepali Chavan Suicide Case: दीपालीच्या आत्महत्येवळी शिवकुमार हरिसाल परिसरात होता; निवासस्थानी गेला, फ्रेश झाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 11:26 AM

Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केली.

मुंबई: अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण (deepali chavan suicide case) या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. याचपार्श्वभूमीवर दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरुण अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेळघाटसारख्या दुर्गम परिसरात सेवा बजावत आणि आपल्या कामाची छाप सोडणाऱ्या दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ करून त्यांची मुस्कटदाबी केली. त्यांनी कच्या रस्त्यावरून पायी फिरण्याची, सुट्टी न देण्याची, वेतन रोखून धरण्याची शिक्षा दिली होती. एका गर्भवती महिला अधिकाऱ्याचा अशाप्रकारे छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणारी ही घटना महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याला आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेला काळिमा फासणारी असल्याचे पत्रात नमूद आहे. 

 'तू पुन्हा लग्न कर, पण...'; आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र

दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केली. त्यावेळी विनोद शिवकुमार हा हरिसाल परिसरात होता. सायंकाळच्या सुमारास तो चिखलदऱ्याला स्वत:च्या शासकीय निवासस्थानी गेला. फ्रेश झाला. मात्र, मोबाईलला रेंज नसल्याने सोशल मीडियावर काय व्हायरल होत आहे, यासोबत दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली, यापासून तो अनभिज्ञ होता. मात्र, रात्री १० च्या सुमारास त्याला चव्हाण यांच्या आत्महत्येची बातमी कुणी तरी मौखिक दिली.

पोलीस सूत्रांनुसार, मोबाईलला रेंज आल्यानंतर तो नखशिखांत हादरला. तोपर्यंत दीपाली चव्हाण यांनी रेड्डी यांच्या नावे सुसाईड नोट लिहिली. त्यात आपले नाव असल्याचेदेखील त्याला कळले. त्याने लगेचच एक बॅग घेऊन शासकीय वाहनाने परतवाडा येथील कार्यालय गाठले. तेथे शासकीय वाहन ठेवून तो खासगी वाहनाने नागपूरकडे रवाना झाला. त्याला बंगळुरु येथे जायचे होते. त्याने तेथे जाणाऱ्या रेल्वेची वेळदेखील शोधली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास तो एका रेल्वेने बंगळुरुकडे पसार होणार होता. त्यासाठी शुक्रवारी सकाळी त्याने नागपूर रेल्वे स्टेशन गाठले व तो अलगद अमरावती ग्रामीण पोलिसांच्या तावडीत सापडला.

उपवनसंरक्षकाकडून दबाव?

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे कुठल्याच दबावाला बळी पडू नका तथा आपल्या एका बहिणीच्या मारेकऱ्यासाठी गद्दारी करू नका, असा मेसेज सोशल मीडियावर वनकर्मचाऱ्यांना पाठवून जनजागृती केली जात आहे. रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली, अशा आशयाचे पत्र वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून लिहून घेतले जात असल्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात काही उपवनसंरक्षकांशी आम्ही चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी निडर राहावे. दीपाली चव्हाण यांना न्याय मिळवून द्यायचा आहे.- प्रदीप बाळापुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, अमरावती.

रवि, नवनीत राणांनी घेतली आयजींची भेट

दीपाली यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला उपवनसंरक्षक शिवकुमार याला पाठीशी घालणारे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तातडीने अटक करावी व दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांची शनिवारी दुपारी भेट घेतली. त्यांच्याशी या प्रकरणावर अर्धा तास चर्चा केली.

टॅग्स :दीपाली चव्हाणअमरावतीमहाराष्ट्रवनविभाग