Join us  

मुंबई भाजप अध्यक्षांच्या मतदारसंघात उमेदवाराच्या मताधिक्यात घट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 2:24 AM

एकूण मतदानात वाढ । विधानसभा निवडणुकीत अधिक परिश्रम घेण्याची गरज

खलील गिरकरविधानसभा । वांद्रे पश्चिम

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले असल्याने भाजपला विधानसभा निवडणुकीत अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल अशी शक्यता आहे. या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेले आमदार आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष असतानाही त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघात भाजप उमेदवाराचे मताधिक्य घटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना ८१,६९६ मते मिळाली असून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना ६६,१११ मते मिळाली आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. या मतदारसंघात २०१४ ला एकूण मतदान १ लाख ४३ हजार ७४८ झाले होते. यंदा या ठिकाणी १ लाख ५४ हजार ९२८ मतदान झाले. ११ हजार १८० जास्त मतदान झाले. या वाढीव मतदानाचा लाभ महाजन यांच्यापेक्षा दत्त यांना जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. २०१४ च्या तुलनेत प्रिया दत्त यांची १६ हजार ७३१ मते वाढली आहेत तर पूनम महाजन यांची केवळ ३,१४९ मते वाढली आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात पूनम महाजन यांना ७८ हजार ५४७ मते मिळाली होती तर प्रिया दत्त यांना ४९ हजार ३८० मते मिळाली होती. त्या वेळी २९ हजार १६७ मताधिक्य मिळाले होते या वेळी हे मताधिक्य १५ हजार ५८५ वर घसरले आहे. यावरून राज्यात व केंद्रात भाजपच्या उमेदवारांना भरभरून मते मिळत असताना व विक्रमी मताधिक्य मिळत असताना शेलार यांच्या मतदारसंघात मात्र भाजप उमेदवाराची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शेलार यांना ७४ हजार ७७९ मते मिळाली होती व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या बाबा सिद्दिकी यांना ४७ हजार ८६८ मते मिळाली होती. शेलार यांना २६ हजार ९११ मताधिक्य मिळाले होते मात्र या लोकसभा निवडणुकीत मताधिक्य केवळ १५ हजार ५८५ वर आल्याने शेलार यांना अधिक परिश्रम करण्याची गरज भासणार आहे.

विधानसभेला काय परिणाम

  • भाजपचे मुंबई अध्यक्ष व विद्यमान आमदार असलेल्या आशिष शेलार यांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटल्याने विधानसभा निवडणुकीत अधिक परिश्रम करावे लागतील.
  • काँग्रेसला झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे.
टॅग्स :आशीष शेलारपूनम महाजनप्रिया दत्त