लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी राहण्याची पर्यायी व्यवस्था स्वत:च केली तर त्यांना महिन्याला २० हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या व्यतिरिक्त अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना भाड्याने राहता यावे म्हणून १८० ते २५० फुटांची ४०० घरेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये आणि रहिवाशांचीही सोय व्हावी म्हणून म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी हे निर्णय घेतले आहेत.
म्हाडाने यंदा ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. या इमारतींमध्ये सुमारे २४०० भाडेकरू राहत असून त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत या शिबिरांत फक्त ७८६ घरे उपलब्ध आहेत.
१३,०९१ - मुंबई शहर जिल्ह्यात आता अस्तित्वात असलेल्या उपकरप्राप्त एकूण इमारती
२०,५९१ - म्हाडाकडील एकूण संक्रमण घरे
या रहिवाशांकरिता तीन वर्षांकरिता १८० ते २५० चौरस फूट क्षेत्रफळाची ४०० घरे भाडेतत्त्वावर घेण्याबाबत जाहिरात देण्यात येणार आहे. पुनर्विकास करणारे खासगी बिल्डर, सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून दोन्ही प्रकारे होणारा खर्च वसूल करण्यात येईल.