Join us  

CoronaVirus News: १०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील; महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 1:14 AM

पोस्ट कोविड ओपीडी होणार सुरू

मुंबई : सद्यस्थितीचा विचार करता मुंबईत ७ हजार ९९ इमारती सील तर कटेन्मेंट झोनची संख्या ५६८ एवढी असून, १०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील होणार आहेत. ही कार्यवाही करतानाच पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा ओपीडी सुरू झाल्यास कोविडपश्चात रुग्णांची नेमकी माहिती मिळून त्यांच्यावर उपचार करता येतील, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

कोरोनासंदर्भातील विविध उपाययोजना, अडचणींचा आढावा घेताना मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत वॉर्ड अधिकाऱ्यांनी रोज चर्चा करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.सर्दी, खोकला, ताप असणाºया रुग्णांवर अँटिजेन टेस्ट करावी. अँटिजेन टेस्टचा वापर टार्गेट ग्रुपवर केल्यास अधिक चांगले परिणाम येतील. सरकारी आणि खासगी इस्पितळात लक्षणे नसलेल्यांना बेड देण्यात येऊ नयेत. खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील करण्यात याव्यात. पोस्ट कोविड ओपीडी सुरू केल्या जाणार आहेत. अशा ओपीडी सुरू झाल्यास कोविड पश्चात रुग्णांची नेमकी माहिती मिळून त्यांच्यावर उपचार करता येतील. जंबो रुग्णालयांच्या आसपासच्या मोठ्या खासगी रुग्णालयांच्या तज्ज्ञांनी जंबो रुग्णालयांना मार्गदर्शन करावे. टेलिमेडिसीनसारखे उपक्रम राबवून कोरोना संक्रमणास रोखण्यासाठी शासन, पालिका प्रशासनास सहकार्य करावे. ज्या वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक आहे तेथे विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचना आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्या आहेत.

मुंबई पालिका काय म्हणते?

मुंबईतले ११ वॉर्ड बी, सी, ए, आरएन, एमडब्ल्यू, एचडब्ल्यू, एचई, एमई, पीएस, एफएन, ई यामध्ये कोविड पॉझिटिव्हचे प्रमाण खूप कमी म्हणजे ७ ते ८ टक्के इतके आढळले तर उर्वरित १३ वॉर्डात अधिक पॉझिटिव्हिटी आढळत आहे. मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्युदर कमी होतोय. जूनमध्ये तो ५.५८ टक्के, जुलै ४.८८ टक्के, आॅगस्ट ४.०७ टक्के, सप्टेंबर २.६ टक्के आहे.मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पदभार स्वीकारल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून कोरोनाचे उच्चाटन केले जात आहे. याच काळात झोपड्यांत कोरोना रुग्ण आढळला तर झोपडपट्टीचा पूर्ण भाग ब्लॉक करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. आणि त्याला कंटेन्मेंट झोन म्हणण्यात येईल.

इमारतीमध्ये रुग्ण आढळला तर घर सील करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. हे सुरू असतानाच पश्चिम उपनगरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पुन्हा पूर्ण इमारत सील करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. आरोग्याच्या सुरक्षेसाठी हे करण्यात आले. स्थानिक प्रशासन याबाबत कार्यवाही करत आहे.

मुंबईत सील इमारती ७ हजार ९९ तर कंटेन्मेंट झोन ५६८

1मुंबई : कोरोनाचा बिमोड केला जात असला तरी अद्यापही मुंबई महापालिकेला पूर्णत: यात यश आलेले नाही. सद्यस्थितीचा विचार करता मुंबईत ७ हजार ९९ इमारती सील असून, कंटेन्मेंट झोनची संख्या ५६८ एवढी आहे.

2मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबईत एकूण ७ हजार ९९ इमारती सील करण्यात आल्या आहेत. यातील एकूण घरांची संख्या २ लाख ११ हजार ६६० आहे. एकूण लोकसंख्या ७ लाख ८६ हजार ४७८ आहे.

3कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांचा आकडा २८ हजार १६९ आहे. सर्वाधिक सील इमारती आर/सी वॉर्डमध्ये असून, हा आकडा १ हजार ३४८ आहे. तर सर्वाधिक कमी सील इमारती ई वॉर्डमध्ये असून, हा आकडा ३७ आहे.

4कंटेन्मेंट झोनचा विचार करता मुंबईत एकूण ५६८ कंटेन्मेंट झोन असून, यातील एकूण घरांची संख्या ८ लाख ४२ हजार ५६३ आहे. तर येथील एकूण लोकसंख्या ३६ लाख ९७ हजार ९६ आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांचा आकडा ३१ हजार ९६२ आहे. सर्वाधिक कंटेन्मेंट झोन एल वॉर्डमध्ये आहेत. हा आकडा ५५ आहे. तर सर्वात कमी कंटेन्मेंट झोन बी वॉर्डमध्ये असून, ही संख्या १ आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस