मुंबई : आखाती देशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याच्या आमिषाने बेरोजगार तरुणांना गंडा घालणाऱ्या एका टोळीचा छडा लावण्यात मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. दक्षिण मुंबईतील मशीद बंदर येथील एका कार्यालयावर छापा टाकून दोघांना अटक करण्यात आले. अक्रम शरीफ शेख (वय ४७, चिता कॅम्प, ट्रॉम्बे) व शाबीर अकबर मास्टर उर्फ मुन्ना (५२, रा.डोंगरी) अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या रोकडीसह ७९ पासपोर्टसह ३० जणांचे आखाती देशाच्या व्हिसाच्या फोटोप्रिंट, रबरी शिक्के जप्त करण्यात आले आहेत.त्यांचा आणखी एक साथीदार परराज्यात फरार असून, तिघांनी महाराष्टÑ, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, गुजरात, ओडिशा आदी राज्यांतील शेकडो युवकांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले, असे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.धारावीत राहात असलेल्या जाहिद खान या ३७ वर्षांच्या इसमाला कुवेतमध्ये नोकरी मिळेल, असे आमिष मुन्ना व शेख यांनी दाखविले होते. त्यासाठी व्हिसा व अन्य आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी त्याच्याकडून ७० हजार रुपये मशीद बंदर स्थानकासमोरील पटवा चेंबर्समधील तिसºया मजल्यावर एका गाळ्यात सुरू असलेल्या कार्यालयात दिले होते. मात्र, त्यानंतर त्याला परदेशात पाठविण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने त्याने गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-१कडे तक्रार केली. प्रभारी निरीक्षक विनायक मेर यांच्या सूचनेनुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता, दोन संगणक, प्रिंटर, कुवेत देशाचे व्हिसाच्या फोटो प्रिंट तसेच चार लाखांहून अधिक रोकड सापडली.दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते आखाती देशात नोकरीच्या आमिषाने ७० ते ७५ हजार रुपये एका तरुणाकडून घेत असल्याचे समोर आले. या टोळीत आणखी एक जण असून तो परराज्यात पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.>१८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीशेख व मुन्ना यांना मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १८ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी मिळाली. या टोळीतील अन्य साथीदारांचा शोध सुरू असून, फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त शहाजी उमाप यांनी केले आहे.
आखाती देशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 05:56 IST