तोतया अधिकाऱ्याने केली फसवणूक
By Admin | Updated: July 14, 2014 02:38 IST2014-07-14T02:38:28+5:302014-07-14T02:38:28+5:30
जेट एअरवेजमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तोतया जेट एअरवेज अधिकाऱ्याने २५ हून अधिक तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे

तोतया अधिकाऱ्याने केली फसवणूक
मनीषा म्हात्रे, मुंबई
जेट एअरवेजमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तोतया जेट एअरवेज अधिकाऱ्याने २५ हून अधिक तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामागील प्रमुख सूत्रधार सुधीर रॉय (३0)सह तिघा आरोपींना भांडुप पोलिसांनी गजाआड केले आहे.
या रॅकेटमध्ये अतुल राजेश तिवारी (२३), अजय ऊर्फ सुरेंद्र घनश्याम पांडे (२३) आणि नरेश दत्ताकोट (२५) हे तिघे सहभागी होते. या त्रिकूटाचे भांडुपच्या ड्रिम्स मॉलमध्ये प्लेसमेंटचे कार्यालय होते. काही दिवसांपूर्वी त्यांची सुधीर रॉयसोबत ओळख झाली. त्याने या त्रिकूटाला आपली जेट एअरवेजमध्ये ओळख असल्याचे सांगून नोकरी मिळवून देत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार या त्रिकूटाने प्लेसमेंट कार्यालयाबाहेर जेट एअरवेजमध्ये नोकरी मिळवून देण्यासंबंधी जाहिराती लावण्यास सुरुवात केली. त्या जाहिरातींना बळी पडत बेकार तरुणांनी कार्यालयात धाव घेतली. हे तिघेही या तरुणांना पाच-पाच जणांच्या गटाने सुधीर रॉयकडे पाठवत असत.
विमानतळ कॅम्पसमध्ये मुलाखती
आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरील कॅम्पसमध्ये कंपनीच्या गणवेशात नोकरीस आलेल्या तरुणांची रॉय मुलाखती घेत असे आणि त्यांना जेट एअरवेजचे बनावट अपॉइंटमेंट लेटरही देत असे. मात्र अपॉइंटमेंट लेटर मिळूनही नोकरीच्या पहिल्या दिवशीच रॉय गायब झाल्याचे आढळल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी ८ जुलै रोजी भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार भांडुपच्या ड्रिम्स मॉलमधून या त्रिकूटाला अटक करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरा जेट एअरवेजच्या कॅम्पसमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपाली कुलकर्णी आणि तपास पथकातील हवालदार भाऊ जगताप, शिवाजी गवळी, जितेंद्र ठाकूर, मनोहर भोसले, रामचंद्र पाटील आणि संतोष पाटील यांनी सापळा रचून या प्रकरणातील मुख्य आरोपी सुधीर रॉय याला ताब्यात घेतले. रॉय याने दिलेल्या कबुलीनंतर आज त्याला अटक करण्यात आली.