पाण्यासाठी मरण यातना--डोंगर देवाचा की समस्यांचा - भाग १
By Admin | Updated: January 28, 2015 00:55 IST2015-01-27T22:09:38+5:302015-01-28T00:55:42+5:30
जीवघेणी पायपीट : देवाचा डोंगर तहानलेलाच...

पाण्यासाठी मरण यातना--डोंगर देवाचा की समस्यांचा - भाग १
शिवाजी गोरे - दापोली-समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतीन हजार फुट उंचीवर असणारा देवाचा डोंगर तहानला असून देवाच्या डोंगरावरील मानवी वस्तीला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्याने, हंडाभर पाण्यासाठी दोन मैल जीवघेणी डोंगर कपारीतील खडतर पायपीट करावी लागत आहे. ‘पाणी म्हणजेच जीवन आहे’, याचा प्रत्यय देवाच्या डोंगरावर गेल्याशिवाय कळत नाही. त्याचे कारणही तसेच आहे. हंडाभर पाण्यासाठी दररोज मरण यातना सहन करण्याचे दुर्भाग्यच त्यांच्या नशिबी आले आहे. देवाच्या डोंगरावरील पाण्याच्या शोधार्थ पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात एखाद्या डोंगरावर वणवा पेटावा, तसा देवाच्या डोंगरावर पाणी टंचाईचा वणवा पेटला आहे. पाणी टंचाईच्या वणव्यात देवाचा डोंगरवासीयांना वेदनेचे प्रचंड चटके बसू लागल्याने, हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करुन पाणी मिळविण्याची बिकट परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. देवाच्या डोंगरावरील विहिरीची पाणी पातळी डिसेंबरमध्येच खालावली असून, पाण्याने तळ गाठल्याने डोंगरावरील भटक्या धनगरवस्तीला केवळ पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भटका समाज यापूर्वी पोट भरण्यासाठी गावोगावी भटकंती करीत होता. मात्र, देवाच्या डोंगरावरील भटक्या धनगर समाजाला आता हंडाभर पाण्यासाठी मैलोन् मैल भटकंती करण्याचे दुर्भाग्य त्यांच्या नशिबी आले आहे. देवाच्या डोंगरावरील तुळशी वाडीत धनगर वस्ती आहे. भटक्या समाजाच्या धनगर वस्तीला भीषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. डोंगरावरील वाडीत विरळ लोकवस्ती आहे. दूरदूर अंतरावर एकेक घर आहे. डोंगरावरील वाडीअंतर्गत रस्तेसुद्धा नाहीत. त्यामुळे, डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन चालताना फार त्रास होतो. वस्तीपासून दोन मैल अंतरावर डोंगराच्या पाझराचे पाणी आहे. देवाच्या डोंगराला फुटलेल्या पाझराच्या थेंबथेंब पाण्याची साठवणूक करुन, वाटीने खरवडून पाणी भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हंडाभर पाण्याचे मोल किती आहे, हे त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. कारण, दिवसाचे २४ तास पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पाण्यासाठी डोळ्यात तेल घालून त्यांना जगावे लागत आहे.
देवाच्या डोंगराच्या कड्या कपारीतून पाऊल वाटेने जाताना अनेक वेळा श्वापदे, जंगली हिंस्त्र पाण्याचीसुद्धा भिती असते. या परिसरात रानडुकर, बिबट्या, सापासारखे प्राणी वारंवार आढळतात. तरीसुद्धा आम्हाला जीवन जगण्यासाठी पाणी आणल्याशिवाय दुसरा उपायच नाही.
डोंगर कपारीत वाघबीळ झरा आहे. त्याच झऱ्यावर या वाडीची पूर्ण मदार आहे. डोंगरातून थेंब थेंब पाझरुन येणाऱ्या पाण्यावर सर्वांचे जीवन अवलंबून आहे. डोंगरातील अडीच हजार फूट दरीतून, कड्या कपारीने वर चढून आल्यावर शरीरातला सर्व त्रास निघून जातो. त्यामुळे, एकाने दरीतून डोंगर चढून वर हंडा किंवा कॅन घेऊन यावा व दुसऱ्या व्यक्तीने पुढील प्रवास पार करावा, अशी दोन व्यक्ती एक हंडार पार करण्यासाठी लागतात. लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांना पाणी आणावे लागले. डोंगरदऱ्या चढून, उतरुन पाणी आणून अनेकांना आजारसुद्धा उद्भवले आहेत. डोक्यावरील हंड्यामुळे काहींच्या डोक्यावर टक्कलसुद्धा पडले आहे. वयाची साठी ओलांडलेल्या आजी कड्याकपाऱ्या चढत डोक्यावर हंडा घेऊन आल्या. पाणी टंचाईबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ‘डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढून वर आल्यावर आपल्या शरीरात जीव आहे की नाही, असे वाटते. पाण्यासाठी आम्ही आमचे मरण रोजच बघतो. पाणी टंचाईच्या वेदना गंभीर आहेत. कधीकधी सरकारची चीड येते. कधी आम्हाला पाणी मिळणार, कधी आमचे जीवन सुखी होणार असेच वाटते,’ असे त्यांनी सांगितले. आजीला एवढ्या दूरचे पाणी आणता येत नाही, म्हणून मी शाळाच सोडली. कारण दिवसभर पाणी भरावे लागते. ७वी नंतर गावात शाळा नाही. शाळेसाठी जाऊन - येऊन १४ किलोमीटर चालत जावे लागते. आपण शाळेत गेलो तर पाणी कोण भरणार, ही व्यथा आहे एका तरुणाची.
१० ते १२ हंडेच पाणी
देवाच्या डोंगरावरील तुळशी वाडीला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून, कामधंदे सोडून केवळ पाण्यासाठीच भटकंती करण्याची वेळीही त्यांच्यावर आली आहे. परिसरात काही ठिकाणी पाण्याचे पाझर झरे आहेत. त्या झऱ्यातील पाणी वाटीने खरडून हंडा भरावा लागत आहे. केवळ एका झऱ्यापासून दिवसाला १० ते १२ हंडेच पाणी मिळत आहे. त्यामुळे झऱ्यावरील पाण्यासाठी नंबर लावून तासन् तास उभे रहावे लागत आहे. जीवन जगण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी दररोज संघर्षमय जीवन जगावे लागत आहे.
उष:काल होता होता...
उष:कालातून सूर्य उगवतो. त्याच उष:कालाच्या साक्षीने पहाटे चार वाजल्यापासून पाण्यासाठीची पायपीट सुरु होते. अंधारात हातात बॅटरी घेऊन बॅटरीच्या प्रकाशात अंधाराची पाऊलवाट तुडवत डोंगरातील कडेकपारी पार केल्या जातात. अति चढ-उतार असणाऱ्या डोंगरातील नागमोड्या व दगडी पाऊलवाटेने रिकाम्या हातानेसुद्धा सहज चालता येत नाही. परंतु, अशा बिकट पाऊलवाटेवरुन ३० ते ४० लीटर पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन चढावे लागते.
चार तास + अडीच हजार फूट पायपीट = हंडाभर पाणी
देवाच्या डोंगरावरील तुळशीवाडीला अडीच हजार फूट चढ-उताराच्या डोंगर कपारीतून एक हंडा पाण्यासाठी ६ ते ७ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. एक हंडा पाणी; चार तास, अडीच हजार फूट डोंगर, एकेरी पाऊलवाट, जीव मुठीत घेऊन आणावे लागत आहे. दऱ्या-डोंगराच्या कडेकपारीत पाय घसरल्यास जीवाला मुकावे लागण्याची भीतीसुद्धा आहे.
थेंबथेंब पाण्यासाठी रांग !
पाण्यासाठी २४ तास देह झिजवावा लागत आहे. पहाटे चार वाजता पाण्यासाठी गेल्यावर ८ वाजता एक हंडा पाणी घरी येते. दिवसाला दोन खेपाच मारण्याइतकी शक्ती शरीरात शिल्लक राहते. शरीराला फार वेदना होतात. दररोज पाण्यासाठी देह झिजवावा लागतो. वाघबीळ दरीत एक छोटासा पाझर झरा आहे. तेथे थोडी माती काढून त्या डुऱ्यातील साठलेल्या थेंबथेंब पाण्यातून, हंडाहंडा पाणी नंबर लाऊन घ्यावे लागते.
गत्यंतरच नाही
देवाच्या डोंगरावरील वस्तीला पाण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून दिवस-रात्र २४ तास भटकंती करावी लागते. अडीच हजार फूट डोंगर उतरुन - चढून डोक्यावर हंडा घेऊन येणे फार त्रासदायक आहे. परंतु त्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याने, पाणी शोधत फिरण्यावाचून गत्यंतर नसते.
देवाच्या डोंगरावरील पाझर झऱ्यातील हंडा - हंडा पाण्याने पिण्याची तहान भागवावी लागत आहे. देवाच्या डोंगरावरील भटक्या समाजाची पाण्याची तहान अजूनही सरकारला भागविता आली नाही. किमान जीवन जगण्या ऐवढे पाणी मिळावे, म्हणून जीवाच्या आकांताने पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.
- काशिनाथ झोरे, ग्रामस्थदेवाच्या डोंगरावरील पाझर झऱ्यातील हंडा - हंडा पाण्याने पिण्याची तहान भागवावी लागत आहे. देवाच्या डोंगरावरील भटक्या समाजाची पाण्याची तहान अजूनही सरकारला भागविता आली नाही. किमान जीवन जगण्या ऐवढे पाणी मिळावे, म्हणून जीवाच्या आकांताने पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.
- काशिनाथ झोरे, ग्रामस्थ