महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर अबू आझमी यांनी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. अबू आझमी सांगतात की, गेल्या तीन दिवसांपासून त्यांना फोन आणि व्हॉट्सअॅपवर सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
जानेवारी महिन्यात अबू आझमी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मुघल शासक औरंगजेबाच्या समर्थनार्थ निवेदन दिल्याने ही धमकी देण्यात आली होती. त्यावेळी फोन कॉल अबू आझमी यांनी घेतला नसला तरी त्यांच्या पीएने तो रिसीव्ह केला होता. फोन करणार्याने अबू आझमी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. आणि लवकरच आझमी यांना मारणार असल्याचे सांगितले होते. या प्रकरणीही पोलिसांनी तक्रार नोंदवली होती, मात्र अद्याप आरोपी पकडला गेला नाही.
सदर प्रकरणाबाबत अबू आझमी यांनी पोलिसांत तक्रारही केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. यापार्श्वभूमीवर आज धुळ्यात समाजवादी पक्षाच्या वतीने यांना देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. अबू आझमी हे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा आवाज म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच ते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असतात असं असताना त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. म्हणून केंद्र शासनाने त्यांना झेड सिक्युरिटी द्यावी अशी मागणी आज समाजवादी पक्षाने केली आहे.