बँकेत नोटा बदलायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By Admin | Updated: November 11, 2016 15:19 IST2016-11-11T14:27:46+5:302016-11-11T15:19:22+5:30
बँकेत नोटा बदलण्यास गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मुलुंडमध्ये घडली.

बँकेत नोटा बदलायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
मुलुंड, दि. ११ - काळा पैसा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा एका रात्रीत चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरातील नागरिकांची एकच त्रेधा उडाली. किशात पैसे असूनही ते वैध नसल्याने नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये झुंबड उडाली असून लांबच लांब रांगा दिसत आहेत. असेच चित्र एटीएम सेंटरबाहेरही दिसत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
अशातच मुंबईतील मुलुंड येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुलुंडच्या हरिओम नगर येथे घडली आहे. विश्वनाथ वर्तक असे त्या वृद्धाचे नाव असून ते ७३ वर्षांचे होते. वर्तक आज सकाळी हरिओम नगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेत गेले होते. रांगेत उबे असतानाच त्यांना अचानक चक्कर आली व ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. वर्तक यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.