आॅनड्युटी पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By Admin | Updated: August 22, 2015 01:18 IST2015-08-22T01:18:12+5:302015-08-22T01:18:12+5:30
कामाच्या अतिताणामुळे आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ट्रॉम्बे येथे घडली.

आॅनड्युटी पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मुंबई : कामाच्या अतिताणामुळे आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ट्रॉम्बे येथे घडली. राजाराम पाटील (५२) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते.
गुरुवारी त्यांची रात्रपाळी असल्याने नेहमीप्रमाणे ते कामावर हजर झाले होते. रात्रभर गस्त घातल्यानंतर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे काही वेळ मोबाइल व्हॅनमध्ये आराम करावा यासाठी ते गाडीमधील बाकावर विश्रांतीसाठी पहुडले. मात्र काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. ही बाब त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी परीक्षा देऊन ते अधिकारी झाले होते. तसेच केवळ ४ ते ५ वर्षेच त्यांची नोकरी शिल्लक होती. नवी मुंबई परिसरात ते पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह राहत होते. (प्रतिनिधी)