...ही तर पुरोगामित्वाची मृत्युघंटा
By Admin | Updated: March 7, 2015 00:56 IST2015-03-07T00:56:30+5:302015-03-07T00:56:30+5:30
परंपरेची कालसुसंगत चिकित्सा करीत राहणे, आत्मटीका करीत स्वत:ला सतत बदलण्याचा प्रयत्न करणे, यातच महाराष्ट्राचे पुरोगामित्व सामावले आहे.

...ही तर पुरोगामित्वाची मृत्युघंटा
मुंबई : परंपरेची कालसुसंगत चिकित्सा करीत राहणे, आत्मटीका करीत स्वत:ला सतत बदलण्याचा प्रयत्न करणे, यातच महाराष्ट्राचे पुरोगामित्व सामावले आहे. पण दाभोलकर-पानसरेंच्या खुनांमुळे ही चिकित्सा नाकारण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. अशा प्रामाणिक टीकाकारांची हत्या ही पुरोगामित्वाची मृत्युघंटा आहे, असे मत कोलंबिया विद्यापीठात महाराष्ट्राच्या इतिहासावर अभ्यास करणारे राहुल सरवटे यांनी व्यक्त केले.
आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या महाराष्ट्र अध्ययन केंद्रातर्फे नुकतेच फाउंडेशनच्या सभागृहात सरवटे यांचे ‘शोध महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा, संघर्षाचा आणि समन्वयाचा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ‘व्हिजन महाराष्ट्र’चे संचालक दिनकर गांगल आणि आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबईचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी उपस्थित होते.
सरवटे म्हणाले, की संतपरंपरेपासून आजपर्यंतचा इतिहास आपण अभ्यासला तर आपल्याला जाणवेल की, महाराष्ट्र हा सतत चिकित्सेचा केंद्रबिंदू राहिला आहे. यामुळेच भारतभर पसरलेला जातीविरोधाचा विचार हा महाराष्ट्रातून मांडला गेला. दुसरीकडे हिंदुत्वाचा विचारही महाराष्ट्रातून पसरलेला दिसतो. तसेच मार्क्सवाद, समाजवादही तेवढ्याच प्रभावाने येथे प्रकटला.
गांधीजींचे मारेकरी अशी दुर्दैवी ओळख महाराष्ट्राची असली तरी याच महाराष्ट्राने गांधी विचारांचे सर्वोत्तम भाष्यकार दिले. विनोबा भावे, स. ज. भागवत, आचार्य जावडेकर अशी कितीतरी नावे देता येतील. या सर्व धारांमधील विचारवंतांमध्ये तात्त्विक संघर्ष असला तरी त्यांच्या ध्येयनिष्ठेबद्दल शंका घेता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील भक्ती परंपरेमध्ये, देशभर मध्ययुगात पसरलेल्या मराठा राज्यामध्ये, बुद्धिवादी तर्कचिकित्सेमध्ये आणि सामाजिक जाणिवेमध्ये महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची मुळे सापडतात. याच पुरोगामित्वाच्या अभिमानाचे रूपांतर विसाव्या शतकात अहंगंडात झालेले दिसते आणि आज या अहंगंडाचा लंबक न्यूनगंडाकडे जाताना दिसतो. यातूनच संकुचित अस्मितांचे राजकारण आणि गोळ्या घालण्याची वृत्ती वाढताना दिसते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
ते म्हणाले, की सापडलेल्या सत्याशी निष्ठा राखणे आणि त्यासाठी पडेल ती किंमत चुकविणे या गुणांवर महाराष्ट्राचा पुरोगामीपणा पारखला गेला. महाराष्ट्रातील विचारवंतांनी ही किंमत वेळोवेळी मोजली आहे. या इतिहासाचा वारस म्हणून आपण आपल्या पुरोगामित्वाची सतत चिकित्सा करीत राहूनच त्याला जिवंत ठेवू शकतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गांगल म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर उत्पन्नाच्या साधनांच्या वंचनेत आपण ज्ञान परंपरांकडे दुर्लक्ष केले. तर आज ग्लोबलायझेशनच्या काळात सर्व विचारधारा संपताना दिसत आहेत. त्यासाठी सरकारवर अवलंबून राहाणे योग्य नाही. लोकांनी अडाणी राहावे, ही सरकारची भूमिका असली तरी लोकांनी ज्ञानी व्हावे, ही आजची गरज आहे.
सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, की इतिहासातील संघर्ष आणि समन्वयाची चर्चा व्हायलाच हवी. पण आपले लक्ष भविष्याकडे असावे, संघर्ष हा इतिहासाचा अटळ भाग आहे. पण संघर्षासोबत समन्वयाची भूमिका हा भारताचा स्थायीभाव राहिला आहे. जे पुरोगामी असतात त्यांचा संघर्ष कधीच एकांगी नसतो, ही समन्वयाची भूमिका आपण सतत जपली पाहिजे.