मानधनवाढीच्या आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

By Admin | Updated: March 26, 2015 01:48 IST2015-03-26T01:48:24+5:302015-03-26T01:48:24+5:30

मानधनवाढ रद्द करणाऱ्या युती सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या मोर्चात आशा पवार (४७) या सेविकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली आहे.

Death of Aanganwadi worker during Mannawadi agitation | मानधनवाढीच्या आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

मानधनवाढीच्या आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आघाडी सरकारने केलेली मानधनवाढ रद्द करणाऱ्या युती सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या मोर्चात आशा पवार (४७) या सेविकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली आहे. दुपारी २ वाजता अचानक चक्कर येऊन पडलेल्या पवार यांना तत्काळ जी टी रूग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. याआधी मानधनवाढीसाठी काढलेल्या मोर्चात एका सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता.
आशा पवार अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी तालुक्यामधील महालगाव अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पश्चात सागर आणि राहूल असे दोन मुलगे आणि आर्या नावाची एक मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचेही निधन झाले होते. त्यामुळे पवार कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंब आता पोरके झाले आहे.
गेल्या दिड वर्षांपासून सुरू असलेल्या या लढाईत आघाडी सरकारने १ एप्रिल २०१४ रोजी अध्यादेश काढत मानधनवाढ देण्याचे मान्य केले होते. मात्र आघाडी सरकारने आर्थिक तरतूद केली नसल्याने वर्षभरातील मानधनवाढ देण्यास युती सरकारने नकार दिला. याउलट १ एप्रिल २०१५ पासून मानधनवाढ देण्याचे मान्य केले. त्यामुळे गेल्या वर्षभरातील थकीत मानधनवाढ मिळावी म्हणून हजारो कर्मचारी आझाद मैदानावर महामोर्चा घेऊन आले होते. (प्रतिनिधी)

राज्यातील उष्माघाताचा पहिला मृत्यू?
आशा पवार त्यांच्या सहकारी सेविका जनाबाई झरेकर यांच्यासोबत मुंबईला रेल्वेने आल्या होत्या. प्रत्यक्षदर्शी जनाबाई झरेकर यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री ९ वाजता निघतेवेळी पवार यांची प्रकृती ठणठणीत होती. आझाद मैदानात आल्यावर आंदोलनादरम्यान त्यांनी वडापाव आणि इतर पदार्थही खाल्ले होते. त्यानंतर तहान लागल्याने ते एकत्रच पाणी पिण्यासाठी मैदानाबाहेर जाणार होते. मात्र आंदोलनस्थळीच चार पावले चालल्यानंतर चक्कर येऊन त्या जागीच कोसळल्या. रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी पवार यांना मृत घोषित केले. उष्माघाताने पवार यांचा मृत्यू झाल्याची शंका उपस्थित होत आहे. तरी आझाद मैदान पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असेही पोलिसांनी सांगितले.

५ लाखांच्या
मदतीची मागणी
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनातर्फे आशा पवार यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र पवार यांच्या कुटुंबाला सरकारने ५ लाख रुपये मदत देण्याची मागणी कृति समितीच्या शुभा शमीम यांनी केली आहे. शिवाय पवार यांच्या एका मुलाला शासकिय नोकरीत सामावून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मुंडे उदासीन,
तर मुनगंटीवार हतबल
महामोर्चा काढण्याचे निवेदन १० दिवसांपूर्वीच दिले असतानाही महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एक दिवसआधी मुंबईतून पळ काढल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. मुंडे यांच्या अनुपस्थित कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतलेल्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंडे यांच्या अभावी कोणताही निर्णय घेता येणार नाही, अशी हतबलता दाखवल्याचे कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी सांगितले. चार दिवसांमध्ये संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.

च्गेल्या दीड वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनवाढीसाठी लढा सुरू आहे.
च्५ फेब्रुवारी २०१४ रोजी आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानधनवाढीची घोषणा केली.
च्३० एप्रिल रोजी अध्यादेश काढत १ एप्रिलपासून अंगणवाडी सेविकांना ९५० आणि मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना ५०० रुपयांची मानधनवाढ लागू झाल्याचे जाहीर केले.
च्आघाडी सरकारने केलेली मानधनवाढ १ एप्रिल २०१५ पासून देण्यासाठी आर्थिक तरतूद करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Death of Aanganwadi worker during Mannawadi agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.