Join us  

...म्हणून मृत पत्नीला कारमध्ये बसवून 'तो' मुंबईभर फिरला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 2:06 PM

मृत पत्नीला कारमध्ये ठेवून एक तरुण संपूर्ण मुंबईभर फिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई -  मृत पत्नीला कारमध्ये ठेवून एक तरुण संपूर्ण मुंबईभर फिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या पत्नीच्या मृतदेहावर पोलिसांना खबर न देता परस्पर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  26 वर्षीय मनी पुरोहित नावाच्या महिलेने 6 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचा पती सुखराम याने या घटनेची माहिती पोलिसांना न देता तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो तिचा मृतदेह अॅम्बुलन्सऐवजी नातेवाईकांच्या कारमधून साकीनाक्याहून बोरिवलीपर्यंत घेऊन गेला.  तेथे आपल्या ज्ञातीबांधवांच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे त्याचे प्रयत्न होते. मात्र नातेवाईकांनी हा प्रकार पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. ते हा मृतदेह तातडीने शताब्दी रुग्णालयात घेऊन गेले. एका खासगी वाहनातून मृतावस्थेतील महिलेला रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती देणारा फोन शताब्दी रुग्णालयातून साकीनाका पोलिसांना आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर नातेवाईकांच्या जबानीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत सुखराम याला अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र आता तो मृत पत्नीला कारमधून नेतानाचा फोटो पोलिसांच्या हाती लागल्याने  या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. "हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. या घटनेबाबत सदर महिलेच्या पतीने आम्हाला माहिती दिली नव्हती. नंतर नातेवाईकांनी दिलेल्या जबाबाच्या आधारावर आम्ही कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पतीस अटक केली. अटक केल्यापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे, असे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी सांगितले. 'मी घरी आलो तेव्हा मला मनी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर मी मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलावले. नंतर एका नातेवाईकाच्या कारमधून तिला रुग्णालयात घेऊन गेलो,'' असा जबाब सुखराम याने पोलिसांकडे दिला आहे. मात्र  पत्नीचा चेहरा का झाकून ठेवला होता, तसेच पत्नीला नेण्यासाठी अॅम्बुलन्स का बोलावली नव्हती याचे उत्तर त्याने अद्याप दिलेले नाही. आता आम्ही मृत महिलेच्या व्हिसेरा अहवालाची वाट पाहत आहोत. जेणेकरून तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल. तसेच या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.   

टॅग्स :गुन्हामुंबई