Join us

"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 19:43 IST

आज ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांच्या स्मृती नाण्याचे विमोचन करण्यात आले.

मुंबई -  "स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या 101व्या जयंतीनिमित्त आज शंभर रुपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले, हा आमच्यासाठी फार मोठा क्षण आहे. बाबूजींचे वर्णन करायचे झाले तर, बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे होते. तशाच प्रकारच्या एका खणखणीत नाण्याचे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज अनावरण होत आहे," असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांच्या स्मृती नाण्याचे विमोचन यशवंतराव चव्हाण सभागृहात एका शानदार सोहळ्यात संपन्न झाले. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, भाजपा नेते मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि 'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

यावेळी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बाबूजींचा आणि माझी फार पूर्वीपासूनची ओळख होती. मी नगरसेवक नंतर महापौर झालो, तेव्हा बाबूजी मला आपुलकीने बोलावून घ्यायचे. लोकमतच्या इमारतीत त्यांची अनेकदा भेट व्हायची, गप्पा व्हायच्या, ते अनेकदा काही सूचनाही करायचे. समोरच्या कुठल्याही व्यक्तीला आपलंस करुन घेण्याची एक विद्या त्यांच्यात होती. काँग्रेसचे नेते असूनही त्यांचे विविध पक्षातील लोकांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि घरगुती सबंध होते. त्यांचा हाच गुण विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि आता तिसऱ्या पीढीने घेतला आहे. "

"बाबूजींनी नेहमी एक पत्रकार आणि राजकीय पक्षाचे नेते म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावली. फार पूर्वी काही काँग्रस नेत्यांनी थेट इंदिरा गांधींकडे बाबूजींची तक्रार केली होती. ते आपल्या पक्षाचे नेते आहेत, पण सगळ्यांच्या बातम्या छापतात, आपल्या विरोधातदेखील छापतात, असे सांगण्यात आले होते. पण, त्यावेळी बाबूजींनी इंदिरा गांधींना स्पष्टपणे सांगितले होते की, पत्रकार म्हणून माझी भूमिका वेगळी आहे. पक्षाचा नेता म्हणून मी माझी भूमिका चोखपणे मांडतो, पण पत्रकार म्हणून जी भूमिका मांडायला पाहिजे, तीदेखील तितक्याच कणखरपणे मांडतो. त्यांचे हे म्हणणे इंदिरा गांधी यांनाही पटले होते." 

"बाबूजींनी राज्याचे मंत्री म्हणून अनेक खात्यांचे काम सांभाळले. उद्योग, आरोग्य पाटबंधारे, क्रीडा..प्रत्येक खात्याचे काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. काहीतरी नवीन, चांगले काम केले पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न असायचा. मुळातच एक स्वातंत्र्यसेनानी असल्याने, त्यांनी नेहमीच काही मूल्ये जपली होती. त्यांनी नेहमी यवतमाळ, नागपूर किंवा संपूर्ण विदर्भासाठी सातत्याने भूमिका मांडल्या. लोकांचा विकास कसा करता येईल, याचा प्रयत्न ते नेहमी करायचे. राज्याच्या सामाजिक राजकीय इतिहासात बाबूजींचे नाव आदराने घेतले जाते. एक पूर्ण व्यक्तिमत्व, अशाप्रकारे आपण त्यांच्याकडे पाहू शकतो," अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसजवाहरलाल दर्डाराजेंद्र दर्डाविजय दर्डामुंबई