हार्बरवरील डीसी लोकल डोकेदुखी
By Admin | Updated: September 8, 2015 02:49 IST2015-09-08T02:49:50+5:302015-09-08T02:49:50+5:30
मध्य रेल्वेवरील मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवर एसी परावर्तनाच्या लोकल धावत असतानाच हार्बरवरील डीसी परावर्तनाच्या लोकल डोकेदुखी ठरत असल्याची कबुली विभागीय रेल्वे

हार्बरवरील डीसी लोकल डोकेदुखी
मुंबई : मध्य रेल्वेवरील मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवर एसी परावर्तनाच्या लोकल धावत असतानाच हार्बरवरील डीसी परावर्तनाच्या लोकल डोकेदुखी ठरत असल्याची कबुली विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली. लवकरच परावर्तन होणे गरजेचे असून, त्यामुळे नवीन एसी परावर्तनाच्या लोकल धावतील आणि तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागणार नसल्याचे ते म्हणाले.
हार्बर मार्गावरील चुनाभट्टी येथे वाशी-सीएसटी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि दोन तास सेवा विस्कळीत झाली. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. तांत्रिक बिघाड झालेली लोकल ही डीसी परावर्तनाची तब्बल २0 वर्षांपूर्वीची असल्याचे समोर आले. हार्बर मार्गावर धावणाऱ्या डीसी परावर्तनाच्या लोकलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने हार्बरवासीयांना सातत्याने मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे नवीन लोकल आल्याशिवाय ही समस्या सुटणे शक्य नसल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सध्याच्या घडीला ३५ लोकल धावत असून, या डीसी (डायरेक्ट करंट) परावर्तनाच्या लोकल आहेत. या मार्गावर २0१६च्या मार्च महिन्यापर्यंत डीसी (१,५00 अल्टरनेट करंट) ते एसी परावर्तनाचे (२५,000 अल्टरनेट करंट) काम पूर्ण केले करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण केल्यानंतरच नवीन एसी परावर्तनाच्या लोकल हार्बरवर धावतील आणि समस्या सुटेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली.