कामोठे येथे ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा
By Admin | Updated: October 10, 2014 02:22 IST2014-10-10T02:22:56+5:302014-10-10T02:22:56+5:30
कामोठे येथील नूतन ज्वेलर्सवर गुरुवारी संध्याकाळी दरोडा पडला. मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी खेळण्यातील पिस्तूलचा धाक दाखवून दुकानातील सुमारे २२ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहेत

कामोठे येथे ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा
नवी मुंबई : कामोठे येथील नूतन ज्वेलर्सवर गुरुवारी संध्याकाळी दरोडा पडला. मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी खेळण्यातील पिस्तूलचा धाक दाखवून दुकानातील सुमारे २२ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहेत. भर दिवसा हा धाडसी दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कामोठे सेक्टर १५ येथे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नूतन ज्वेलर्सच्या दुकानात मालकाचा मुलगा व कामगार असे दोघे जण बसले होते. यावेळी पल्सर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानातील दोघांना पिस्तूलचा धाक दाखवून तेथील सोन्याचे दागिने चोरून नेले. दुकानातील सुमारे २२ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. भरदिवसा घडलेल्या दरोड्याच्या या घटनेने पुन्हा एकदा पोलीस सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर ज्वेलर्सला सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता. त्यामुळे दरोडेखोर दरोडा टाकून सहज पळाले. मात्र दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना चित्रित झाली आहे. लुटारूंनी खेळण्यातल्या पिस्तूलच्या सहाय्याने ज्वेलर्स लुटले असल्याचे श्रीराम मुल्लेमवार यांनी सांगितले. लुटारूंचा शोध सुरू असून कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)