Join us  

उन्हाळ्याच्या वातावरणातही मुंबईकरांची पहाट गारेगार; किमान तापमान १७ अंश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 1:42 AM

अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगावच्या किमान तापमानात घट

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात ३८ अंशावर दाखल झालेले मुंबईचे तापमान मार्च महिन्यात १७ अंशांवर आले आहे. ८ मार्च रोजी सांताक्रुझ आणि कुलाबा येथे किमान तापमानाची नोंद अनुक्रमे १७.६, १९.६ अंश सेल्सिअस झाली आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला गारेगार झालेल्या पहाटेने मुंबईकरांना किंचित का होईना दिलासा दिला आहे.

या व्यतिरिक्त उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागांत तापमान घटल्याची नोंद झाली असून, यात अहमदनगर, पुणे, नाशिक आणि जळगावचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारसह मंगळवारी मुंबईचे आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, १९ अंशांच्या आसपास राहील.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे.

मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीइतके नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.९ ते १२ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.

टॅग्स :हवामान