भिसे खिंडीत भीषण अपघातात दाम्पत्य ठार
By Admin | Updated: March 8, 2015 22:28 IST2015-03-08T22:28:55+5:302015-03-08T22:28:55+5:30
रोहा तालुक्यातील मेढानजीक भिसे खिंडीत आज रविवारी दुपारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात जुईनगर पेण(गडब) येथील दाम्पत्याला प्राण गमवावा लागला

भिसे खिंडीत भीषण अपघातात दाम्पत्य ठार
धाटाव : रोहा तालुक्यातील मेढानजीक भिसे खिंडीत आज रविवारी दुपारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात जुईनगर पेण(गडब) येथील दाम्पत्याला प्राण गमवावा लागला, तर या अपघातात रोहा शिवसेनेचे तालुका प्रमुख कृष्णा धामणे हेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात अधिक उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.
शिवसेनेचे तालुका प्रमुख कृष्णा धामणे हे चारचाकी वाहनाने रोह्याकडे येत असताना रोह्याकडून नागोठणे बाजूकडे जाणारा दुचाकीस्वार जगदीश काशिनाथ म्हात्रे (४0) यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत जगदीश म्हात्रे हे जागीच ठार झाले. त्यांची पत्नी सपना म्हात्रे (३५) यांना अलिबाग येथे रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले, मात्र उपचाराला त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचीही प्राणज्योत मावळली. दरम्यान, हा अपघात भिसे खिंडीनजीक जोगेश्वर मंदिराजवळ घडला.
या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अपघाताबाबत रोह्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आर. के. झगडे यासह सहकारी अधिक तपास करीत आहेत. याबाबत मोटार अपघाताची नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, वारंवार होत असलेल्या अपघातामुळे या परिसरातील वातावरण गंभीर आहे. याठिकाणी सुरक्षेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिक वर्गातून व्यक्त झाली आहे. (वार्ताहर)