Join us  

दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 7:33 AM

शहरातील तापमान प्रचंड वाढले आहे. तळपत्या उन्हात उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करताना त्रास होत आहे. त्यात अनेक उमेदवारांनी दुपारची काही वेळ विश्रांती घेऊन रात्री दहापर्यंत प्रचाराचा धडाका लावला आहे. ढोल ताशाच्या गजरात प्रत्येक मतदारसंघात मु

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार मुंबईत टिपेला पोहोचत असून अनेक भागात पदयात्रा सुरू झाल्या आहेत. मात्र भौगोलिक दृष्ट्या मोठा असणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन प्रचार करणे उमेदवारांना अशक्य झाले आहे. पायाला भिंगरी लावत उमेदवार शक्य तेवढा मतदारसंघ पिंजून काढत आहे. समाजमाध्यमांचा आधार घेत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यात उमेदवार, कार्यकर्ते यांची चांगलीच दमछाक होत आहे.

शहरातील तापमान प्रचंड वाढले आहे. तळपत्या उन्हात उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करताना त्रास होत आहे. त्यात अनेक उमेदवारांनी दुपारची काही वेळ विश्रांती घेऊन रात्री दहापर्यंत प्रचाराचा धडाका लावला आहे. ढोल ताशाच्या गजरात प्रत्येक मतदारसंघात मुख्य रस्त्यावर रथयात्रा काढत प्रचार सुरू आहे. एका कार्यकर्त्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, मतदारसंघातील असे अनेक परिसर आहेत, तेथे उमेदवाराला प्रत्यक्ष पोहोचणे शक्यच होत नाही. त्या ठिकाणी प्रचाराची गाडी फिरविली जात आहे. त्यामध्ये दोन कार्यकर्ते आणि रेकॉर्ड केलेली टेप लावून गाडी फिरत असते. 

चौक सभांवर जोरकमी वेळेत अधिक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात चौक सभा सुरु झाल्या आहेत. चौकसभेचे नियोजन अशा पद्धतीने केले जात आहे की, एक सभा संपली की दुसऱ्या चौक सभेच्या ठिकाणी अगोदरच कार्यकर्त्यांना पुढे पाठवून तेथील नियोजन केले जात आहे.    

पाणी, ओआरएस सोबतच उकाड्याच्या काळात प्रचार करताना कार्यकर्त्यांना भोवळ आली तर सोबत ओआरएस सुद्धा ठेवण्याची काळजी घेतली जात आहे. त्यासोबत मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. सगळ्याच कार्यकर्त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ऊन जास्त लागले असेल तर आराम करण्याचा सल्ला दिला जात आहे.

‘पगारी’ कार्यकर्ते      आपल्याकडेच कशी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, हे दाखविण्यासाठी पगारी कार्यकर्त्यांचा आधार घेतला जात आहे. दिवसाला १०००-१५०० रुपये रोजाने माणसे या रॅलीत सहभागी होत असली तरी हा मामला जास्त उघड होताना दिसत नाही. हा सगळा आर्थिक व्यवहार बंद दाराआड होत असल्याने फार चर्चा घडून येत नाही. विश्वासू सहकारी हा व्यवहार बघतात. त्याची कुठे वाच्यता होणार नाही, याची काळजी घेतली जाते. सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत या कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या मागे फिरणे आवश्यक असते. त्यांच्यावर नजर ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित झालेली असते.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४