४८ देशांतील २७ हजार नागरिकांचा डाटा नायजेरियन ठगांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:39+5:302021-02-05T04:28:39+5:30

नोकरीच्या आमिषाने गंडा : काेट्यवधी रुपयांची फसवणूक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमीष दाखवून ...

Data of 27,000 citizens from 48 countries in the hands of Nigerian thugs | ४८ देशांतील २७ हजार नागरिकांचा डाटा नायजेरियन ठगांच्या हाती

४८ देशांतील २७ हजार नागरिकांचा डाटा नायजेरियन ठगांच्या हाती

नोकरीच्या आमिषाने गंडा : काेट्यवधी रुपयांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमीष दाखवून गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीतील चौकडीला पुण्यातून अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या चौकडीने आतापर्यंत हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला. त्यांच्याकडे ४८ देशांतील २७ हजार नागरिकांचा डाटा सापडला असून, यात शेकडो कोटींची फसवणूक झाल्याचा संशय सायबर पोलिसांना आहे.

तक्रारदार विशाल मांडवकर हे परदेशातील हॉटेलमध्ये नोकरीच्या शोधात होते. याचसंदर्भातील एका संकेतस्थळाची माहिती मिळताच त्यांनी आपला बायोडाटा तेथे शेअर केला. पुढे त्यांना नियुक्तीपत्रही मिळाले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर व्हिजा, प्रोग्राम फीच्या नावाखाली त्यांच्याकडून १७ लाख २२ हजार ८०० रुपये घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

तपासाअंती सायबर पोलिसांनी पुणे येथील उंड्री भागातून ओगुसकीन उर्फ मायकल ओलाएनी (३२), सोटोमिवा ळ थॉम्पसन (२५), ओपेयेमी ओडेले ओगुनमोरोटी (२६) ऑगस्टीन विलियम (२२) या नायजेरियन चाैकडीला अटक केली. त्यांच्याकडून १४ मोबाईल, ४ लॅपटॉप, ३ मेमरी कार्ड, ५ राउटर, डेटा कार्ड २ आंतरराष्ट्रीय क्रमांकाचे सीमकार्ड जप्त केले.

ठगांच्या हाती २७ हजार जणांचा डाटा लागला होता. त्यांच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून ही माहिती समोर आली. यापैकी २ हजार लोकांशी त्यांनी संपर्क साधला, तर अडीच हजार जणांच्या पासपोर्टचा डेटा इतर पाहिजे आरोपींकडून त्यांना मिळाला. अटक चौकडी बेटिंग तसेच विविध डेटिंग साईट्सचाही मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून आले आहेत. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

- ६४ बँक खात्यांचा वापर

फसवणुकीसाठी या टोळीने १२ भारतीय बँकांमध्ये ६४ बँक खात्यांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात, महाराष्ट्रासह दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तरप्रदेश, आसाम येथील बँक खात्यांचा समावेश आहे. यापैकी ११ बँक खात्यांचा तपशिल सायबर पोलिसांना सापडला असून, त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोन परदेशी बँक खात्यांपैकी एक बँक खाते दुबईतील आहे.

....................................

१० कोटी नायजेरियाच्या बँक खात्यात ट्रान्सफर

फसवणुकीतून मिळविलेल्या रकमेपैकी १० कोटी रुपये ठगांनी नायजेरियाच्या बँक खात्यात ट्रान्सफर केल्याची माहिती तपासात समोर आली. यात, शेकडो कोटीची फसवणूक झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.

..

Web Title: Data of 27,000 citizens from 48 countries in the hands of Nigerian thugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.