भरधाव डम्परच्या धडकेत दोन चिमुरडे ठार
By Admin | Updated: July 17, 2015 05:05 IST2015-07-17T05:05:12+5:302015-07-17T05:05:12+5:30
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर जाकीर हुसेन नगर परिसरात एका भरधाव डम्परने चौघांना चिरडल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ५च्या सुमारास घडली. यात २ अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव डम्परच्या धडकेत दोन चिमुरडे ठार
- गोवंडीच्या जाकीर हुसेन नगरातील घटना
मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर जाकीर हुसेन नगर परिसरात एका भरधाव डम्परने चौघांना चिरडल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ५च्या सुमारास घडली. यात २ अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी डम्परचालकास बेदम मारहाण केल्याने तोही गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघातात जखमी दोघांसह डम्परचालकाला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५च्या सुमारास जाकीर हुसेन नगरजवळील सिग्नलच्या दुभाजकावर जमाल अन्सारी, त्याची दोन मुले परेवझ (१२), अनस (९) आणि अन्य एक लहान मुलगा असे चौघे उभे होते. त्या वेळी एका भरधाव डम्परने या चौघांना धडक दिली. त्यात परवेझ व अनस जागीच ठार झाले. तर जमाल व अन्य अनोळखी मुलगा गंभीररीत्या जखमी झाले. या दोघांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डम्परची तोडफोड
अपघातानंतर गोळा झालेल्या स्थानिक रहिवाशांनी व पादचाऱ्यांनी डम्परचालकाला बेदम मारहाण केली; तसेच डम्परचीही तोडफोड केली. यामुळे बराच वेळ येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. बंदोबस्तासाठी देवनार, शिवाजीनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. जखमी डम्परचालकालाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो मारहाणीत जखमी झाल्याची माहिती मिळते.