दहीहंडीच्या अर्थकारणाला वेसण!
By Admin | Updated: September 4, 2015 00:06 IST2015-09-04T00:06:16+5:302015-09-04T00:06:16+5:30
दहीहंडीच्या वादंगामुळे मुंबई-ठाण्यातील प्रसिद्ध आयोजक उत्सवातून ‘बॅकफूट’वर गेले आहेत. कोणी दुष्काळाचे तर कोणी निर्बंधाचे कारण पुढे देत उत्सवातून प्रमुख आयोजकांनी सपशेल माघार घेतली

दहीहंडीच्या अर्थकारणाला वेसण!
स्नेहा मोरे, मुंबई
दहीहंडीच्या वादंगामुळे मुंबई-ठाण्यातील प्रसिद्ध आयोजक उत्सवातून ‘बॅकफूट’वर गेले आहेत. कोणी दुष्काळाचे तर कोणी निर्बंधाचे कारण पुढे देत उत्सवातून प्रमुख आयोजकांनी सपशेल माघार घेतली. आयोजकांच्या माघारीमुळे उत्सवाचे तर नुकसान झालेच पण तब्बल १५० कोटींचे अर्थकारणदेखील कोलमडण्याची चिन्हे आहेत. यंदा गोविंदा पथकांना वालीच उरला नसल्याने त्यांचीही आर्थिक गणित जुळवण्याची धडपड सुरू आहे.
पूर्वी ‘श्रीकृष्णाचे वारस’ म्हणवून घेणारे गोविंदा गेल्या काही वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे गोविंदा म्हणून मिरवू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी दहीहंडीला लावलेल्या मोजक्या नोटा आणि हंडीतला पौष्टिक प्रसाद हीच आपल्या साहसाला शाबासकी मानण्याची जणू प्रथा होती. मात्र गेल्या काही वर्षांत बोली किती लाखांची याचा विचार करूनच गोविंदा मनोरे रचू लागले. त्यामुळे बदललेल्या उत्सवाची अर्थकेंद्री बाजू अधिक प्रखर झाली. यंदा मुंबई-ठाण्यात ८० च्या जवळपास गोविंदा पथके आठ-नऊ थरांच्या स्पर्धेत आहेत. मात्र त्यांना उत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक पाठबळच नसल्याने त्यांची फरफट सुरू आहे.
मुंबई-ठाण्यातील जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर, संजय निरुपम, कृष्णा हेगडे, राम कदम, गीता गवळी, आनंद परांजपे अशा एक ना अनेक आयोजकांनी यंदाचा उत्सव रद्द केला. या सगळ्या आयोजकांचा उत्सव खर्च तब्बल १५० कोटींच्या घरांत जायचा, अशी माहिती प्रमुख आयोजकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. स्टेज आणि डीजेच्या आयोजनासाठी तब्बल ६०- ७० लाखांचा खर्च गेल्या वर्षीपर्यंत केला जात असे. तर सेलीब्रिटींच्या उपस्थितीसाठी २ लाखांहून अधिकची रक्कम खर्ची व्हायची. त्यामुळे स्टेज, डीजे, सेलीब्रेटी, ट्रॉफी या मुद्द्यांमुळे थरांची स्पर्धा अटीतटीची व्हायची. परंतु, यंदा या उत्सवात ‘खणखणाट’ होणार नाही. कारण भविष्यात निवडणूकही नसल्याने राजकीय आणि आर्थिक असा दोन्ही बाजूंनी सारासार विचार करून प्रसिद्ध आयोजकांनी हंडीचे ‘लोणी’ वाचविण्याचा आटापिटा सुरू केला आहे. त्यामुळे पथकांची मात्र मोठीच पंचाईत झाली आहे. पर्यायाने उत्सव साजरा करण्यासाठी लागणारा ५० हजार ते दीड लाखांच्या खर्चाचे व्यवस्थापन जुळत नसल्याने गोविंदा पथकांमध्ये नाराजी आहे.
गेल्या काही वर्षांत दहीहंडीच्या उत्सवात भांडवली गुंतवणुकीसोबतच नेत्यांनी राजकीय प्रभाव वापरून सेलीब्रेटींची उपस्थिती अनिवार्य करून टाकली. साहजिकच, त्यामुळे कॅमेऱ्यांचे वलय आले आणि त्यामागोमाग जाहिरातदारांनीही डोके वर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळेच या उत्सवाला राजाश्रयाबरोबरच कॉर्पोरेट विश्वाचेही कवच मिळाले. परिणामी, गेल्या काही वर्षांपासून हा सण केवळ बाळगोपाळांचा, कृष्णभक्तीचा न राहता पूर्णपणे राजकीय प्रतिष्ठेचा आणि आर्थिक हितसंबंधांचा उत्सव बनला. सध्याच्या भ्रमस्थितीमुळे दहीहंडीमागील अर्थकारणालाही खीळ बसणार आहे.