Join us  

फेसबुकवर मिळणार दहिसरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 6:04 PM

श्री विठ्ठल रखुमाई  मंदिरात दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी यंदा दिसणार नाही.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : पश्चिम रेल्वेचे दहिसर हे मुंबईचे शेवटचे स्थानक, तर मुंबई महानगर पालिकेच्या 227 प्रभागाची सुरवात ही दहिसर प्रभाग क्रमांक 1 पासून होते. पश्चिम उपनगरातील सुमारे 125 वर्षांची परंपरा असलेले  दहिसर  पश्चिमेला असलेल्या 125 वर्षांची परंपरा असलेले श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तर दहिसर पूर्वेला देखिल  छत्रपती शिवाजी महाराज काॅम्प्लेक्स, काशीमठ संस्थान वाराणसी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हे देखिल मंदिर आहे. रेल्वेने मीरा रोड करून दहिसरला येतांना या मंदिराचा कळस दिसतो.

कोरोनाच्या महामारीमुळे उद्याच्या आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी दहिसर पश्चिम येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात व छत्रपती शिवाजी महाराज काॅम्प्लेक्स,काशीमठ संस्थान येथील श्री विठ्ठल रखुमाई  मंदिरात दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी यंदा दिसणार नाही. कोरोनामुळे सध्या सर्वच धार्मिक स्थळ,मंदिर दर्शन बंद आहे.मात्र सोशल मीडियाचा उपयोग करून उद्या घरबसल्या फेसबुकवर  दहिसर पश्चिम येथील दोन्ही श्री विठ्ठल रखुमाई मंदिरांचे दर्शन भाविकांना मिळणार आहे.

 दहिसर रेल्वे स्टेशन पश्चिम जवळील दहिसर गावठाणात असलेले श्री विठ्ठल रखुमाई मंदिर 125 वर्षे जुने मंदिर आहे. भारतात रेल्वे सुरू झाली. त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक सुरू झाली, परंतू दहिसरला रेल्वे स्टेशन नव्हते. त्यामुळे दहिसरकरांना बोरिवलीपर्यंत चालत जावे लागत होते. दहिसरचे समाजसेवक यशवंत तावडे यांनी येथे रेल्वे स्थानक व्हावे यासाठी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न केले आणि दहिसर रेल्वे स्थानक झाले. त्यानंतर ग्रामस्थांचा उत्साह वाढला. गावात विठ्ठल रखुमाई मंदिर स्थापनेचा त्यांनी निर्धार केला. सखाराम तरे यांनी मंदिरासाठी जागेची देणगी दिली. सन १८९४मध्ये यशवंत तावडे यांनी सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून येथील विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना केली. महत्वाचे म्हणजे आजही जुन्या त्याच मूर्ती आहेत. आणि मंदिराचे जतन योग्य प्रकारे केल्याने हे विठ्ठल रखुमाई मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान झाले आहेत.

दहिसर गावठाणाच्या या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात  प्रसिद्ध असलेला सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी शिस्तप्रियपणे व उत्साहात अनेक वर्षांपासून साजरा होत आहे. तसेच मंदिरात सर्व धार्मिक सण उत्सव आणि राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात. गेल्या वर्षांपर्यंत या मंदिरात शेकडो दिंड्या आणि हजारो विठ्ठलभक्त दर्शनासाठी येत होते. भक्तांना मंदिर ट्रस्ट तर्फे फलहार दिला जातो.तर महिला भक्ताना गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात तुळशी वृंदावन वाटप केले होते. या मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष,माजी नगरसेवक-शिवसेना उपविभागप्रमुख भालचंद्र  म्हात्रे, तसेच विजय पाटील, मनोहर पाटील, मधुकर रसाळ हे विश्वस्त आहेत.

कोरोना या महाभयंकर आजाराशी आपण झुंज देत आहोत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शासकीय आदेशानुसार दहिसर पश्चिम येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर उद्या आषाढी एकादशीला पूर्णपणे बंद राहणार आहे. मंदिराजवळ आणि परिसरात कोणीही गर्दी करु नये. आपल्या दहिसर विभागात मुंबई पोलीसांच्या आदेशानुसार कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षितता राखावी. या मंदिराच्या इतिहासात मंदिरात आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने बंद ठेवावे लागत आहे. मात्र उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी मोबाइल फेसबुकवर मंदिराचे प्रक्षेपण दिसणार आहे अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष भालचंद्र  म्हात्रे यांनी दिली.

 उत्तर मुंबईत सतरा वर्षांपासून 130 फूट उंच आणि 5 मजली असे दहिसर ( पूर्व) छत्रपती शिवाजी महाराज काॅम्प्लेक्स,सुधींद्र नगर येथील काशीमठ संस्थान वाराणसी  श्री विठ्ठल रखुमाई हे देखणे मंदिर आहे. 22 मे 2003 साली साडे सहा कोटी रुपये खर्च करून या मंदिराची स्थापना केली.तर 2017 मध्ये 7 कोटी रुपये खर्च करून या मंदिराचे नुतनीकरण केले. सर्व भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध असलेल्या  सदर मंदिर  कोविड19-या आजाराच्या काळात मार्च महिन्यापासून बंदच आहे.

उद्या आषाढी एकादशी दिवशी सर्वांसाठी शासकीय आदेशानुसार सदर मंदिर सक्तीने बंद राहणार आहे. सर्व विठ्ठलभक्त दर्शनासाठी आपल्या घरातच राहून मोबाईल फेसबुक वर दर्शन घ्यावे अशी विनंती असे मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मोहनदास मल्ल्या आणि सरचिटणीस मधुसूदन पै यांनी विनंती केली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई