मुंबईवर डेंग्यू, मलेरियाचे सावट, रुग्ण वाढले : सप्टेंबरच्या ११ दिवसांत मलेरियाचे २७१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 07:00 IST2017-09-14T06:59:54+5:302017-09-14T07:00:08+5:30
‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा मुंबईकरांना सप्टेंबर महिन्यात सोसावा लागतो आहे. त्यामुळे ‘घामाघूम’ झालेल्या मुंबईकरांना आजारांना सामोरे जावे लागते आहे. पावसाने दडी मारूनही मुंबईवरील डेंग्यू, मलेरियाचे सावट कायम असल्याने काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

मुंबईवर डेंग्यू, मलेरियाचे सावट, रुग्ण वाढले : सप्टेंबरच्या ११ दिवसांत मलेरियाचे २७१ रुग्ण
मुंबई : ‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा मुंबईकरांना सप्टेंबर महिन्यात सोसावा लागतो आहे. त्यामुळे ‘घामाघूम’ झालेल्या मुंबईकरांना आजारांना सामोरे जावे लागते आहे. पावसाने दडी मारूनही मुंबईवरील डेंग्यू, मलेरियाचे सावट कायम असल्याने काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते ११ या दरम्यान पालिकेच्या रुग्णालयात मलेरियाचे २७१ रुग्ण आढळले आहेत. तर त्याखालोखाल गॅस्ट्रोचे २०० आणि डेंग्यूचे १०२ रुग्ण आढळले आहेत. तसेच, स्वाइनचे २० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिवसागणिक मुंबई शहर-उपनगरांत साथीच्या आजारांचा आलेख चढताच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वेळोवेळी प्रशासनातर्फे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होत असल्याने मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते आहे. त्याचप्रमाणे, शहर-उपनगरातील वातावरणात आर्द्रतेची वाढ झाल्याने श्वसनाचे विकारही उद्भवत आहेत. धुके आणि धुळीकणांमुळे त्वचासंसर्गही वाढत आहे. दोन्ही वेळेत वातावरणात खूपच तफावत असल्याने साथीचे आजार वाढत आहेत.