पनवेलमध्ये गर्दीने ट्रॅफिक जाम
By Admin | Updated: October 21, 2014 23:53 IST2014-10-21T23:53:27+5:302014-10-21T23:53:27+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पनवेलची बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली होती, शिवाय रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर प्रवासीचप्रवासी दिसून येत होते.

पनवेलमध्ये गर्दीने ट्रॅफिक जाम
पनवेल : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पनवेलची बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली होती, शिवाय रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर प्रवासीचप्रवासी दिसून येत होते. या व्यतिरिक्त महामार्गावरही वाहनांची संख्या वाढली होती. अनेक दुकानांत दुकानदारांची त्रेधातिरपीट झाल्याचे दिसून आले.
दिवाळी हा सण आनंद, उत्साह त्याचबरोबर प्रकाशमय जीवनाचे प्रतीक आहे. दीपोत्सव म्हणून दिवाळी ओळखली जाते. सुट्टी, त्याचबरोबर नवीन कपडे, फटाक्यांची आतषबाजी आणि फराळाची मेजवानी यामुळे बच्चे कंपनीच्या आनंदाला पारावार उरत नाही. या सणानिमित्त विखुरलेले कुटुंब एकत्र येतेच, शिवाय अनेक जण आपल्या मूळ गावी जातात. आज पनवेलच्या ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. फराळाचे साहित्य, मिठाई, कपडे, फटाके पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी पनवेल, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून लोक आले होते. कापड बाजार त्याचबरोबर सराफी पेढयाही गर्दीने फुलून गेल्या होत्या. मिठाई, किरणा दुकानात मिठाई आणि गोड-धोड पदार्थ तयार करण्यासाठी किराणा घेणाऱ्यांची लगबग दिसत होती.
याशिवाय भाजी मार्केटमध्ये फुले आणि हारांच्या दुकानात ग्राहकांनी गर्दी केली होती. तालुक्यातून आज हजारो वाहने शहरात आल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. दिवाळीकरिता शाळांना सुट्टी असल्याने अनेक जण बॅगा भरून मूळ गावाला रवाना झाले. परिणामी, घाटमाथ्यावरील एसटी गाड्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. अनेकांनी पूर्वीच आरक्षण केल्याने ते आरक्षीत बस गाडीची वाट पाहताना दिसत होते.
पनवेल बसस्थानक रविवारपासून गर्दीने फुलून गेले होते जिकडे तिकडे प्रवासीच प्रवासी दृष्टिक्षेपास पडत होते. घाटावर जाणाऱ्या गाडया प्रवाशांनी गच्च भरून मार्गस्थ होत होत्या. या व्यतिरिक्त पनवेल आगारातून जादा बसगाड्याही सोडण्यात आल्या, त्याही फुल्ल झाल्या.
आज पनवेल रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आतुरता या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कोकण आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल झाल्या होत्या.